राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, जिल्हाध्यक्ष रुपेश खांडगे आणि आरिफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आज मा. जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांना शेतकऱ्यांच्या वेदना व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टी, पुर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांचे तसेच ग्रामीण भागातील जनजीवन अक्षरशः उध्वस्त झाले आहे.गावोगावी नद्या ओसंडून वाहत आहेत; पिकं, जनावरं, घरं आणि संसार पाण्याखाली गेले आहेत.माती वाहून गेल्याने शेतजमीन ओसाड पडली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या वह्यांवर चिखलाचा थर साचला आहे, आणि बळीराजा अंधारात बुडाला आहे.गाई-वासरांना जीव गमवावा लागला, घरं कोसळली, जनावरं वाहून गेली.या परिस्थितीत सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे.दौरे आणि घोषणांचा पाऊस पडला, पण मदतीचा एक थेंबही शेतकऱ्यांच्या हातात पडला नाही.शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारसमोर खालील मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.
राज्यात तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी किमान ₹१,००,००० इतकी थेट आर्थिक मदत द्यावी.भूमिहीन शेतमजूर, जनावरं गमावलेली कुटुंबं आणि पूरग्रस्त गावांसाठी स्वतंत्र मदत पॅकेज जाहीर करावे.
पीकविमा कंपन्यांना आदेश देऊन तत्काळ नुकसानभरपाई अदा करण्यास भाग पाडावे.
पंचनामे तातडीने पूर्ण करून स्वयंघोषणा पद्धतीने मदत वितरित करावी.कर्जमाफीचा तात्काळ निर्णय घेऊन नव्या कर्जवाटपाला गती द्यावी.
नुकसान झालेल्या घरांना, जनावरांना आणि पायाभूत सुविधांना वेगळी भरपाई द्यावी.
राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून सर्वपक्षीय प्रतिनिधींना चर्चेत सहभागी करून ठोस निर्णय घ्यावेत.
“काळी दिवाळी” आंदोलन सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर “काळे कंदील” लावण्याचा प्रयत्न केला.हे प्रतीकात्मक आंदोलन शेतकऱ्यांच्या वेदनेचे आणि सरकारच्या अपयशाचे द्योतक होते.ॲड. अमोल मातेले यांचे प्रतिपादन “शेतकरी आज रडतोय कारण त्याचं घर, शेत, जनावरं आणि भविष्य सगळं पाण्यात गेलं आहे.पण सरकार मात्र फक्त फाईल पुढे सरकवतंय!
‘ज्यांच्या घामाच्या थेंबाने देशाचं पोट भरतं, त्याच बळीराजाच्या आयुष्यात काळोख फुलू देऊ नका!’” उपस्थित पदाधिकारी या आंदोलनात आणि निवेदन युवक जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, इमरान खान, उपाध्यक्ष तोशिब आतार ,सरचिटणीस इमरान तडवी, लक्ष्मण पवार, सेलम देवेंद्र, प्रशांत शंकर, सुदर्शन खंडागळे, दीपक सावंत, गजाकोश, संजय कांबळे, प्रशांत दिवटे आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














