भाजपमध्ये विरोधकांना प्रवेश दिला जात आहे, तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही फोडलं जात असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं दिसून आलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वच मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे यांनी भाजपात प्रवेश केला. याआधी हे तिन्ही नगरसेवक भाजपमध्येच होते, मात्र त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. आता त्यांची पुन्हा एकदा घरवापसी झाली. भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रयत्न केल्यानंतर या तीनही माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी धक्का समजला जात आहे.
याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून सर्वच पक्षांतील नेत्यांची फोड सुरू असल्याचं दिसतंय. त्यामधून शिंदेंची शिवसेनाही सुटली नाही. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजपने शिंदेंच्या सेनेचे संभाव्य उमेदवार, पदाधिकारी फोडले आणि त्यांना भाजपकडून तिकीट दिल्याचं चित्र आहे.
शिवसेना मंत्र्यांची नाराजीची कारणे पुढीलप्रमाणे :
- सेनेचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी यांना फोडून भाजपमध्ये घेतलं जात आहे.
- ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवाराला भाजप आपल्या पक्षात घेत आहे.
- शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेतले जातात किंवा निधी वळवला जातो.
- येऊ घातलेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही.
- निधी मिळवण्यासाठीही शिंदेच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- संभाजी नगर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतले आहेत किंवा युतीचा धर्म पाळला नाही.














