kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भाजपा अजून आत्मनिर्भर नाही – उद्धव ठाकरे

भाजपाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवले होते. पण अजून भाजपा स्वतः आत्मनिर्भर झालेले नाही. असे विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारमधील पक्ष आता एकमेकांना खायला निघाले आहेत. हा त्याचा पक्ष फोडतोय, तो ह्याचा पक्ष फोडतोय. आता यांना कळेल, काय होते? कारण पक्षातून गेले ते सर्व बाजारबुणगे गेले आहेत. भाजपाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवले होते. पण अजून भाजपा स्वतः आत्मनिर्भर झालेले नाही. त्यांना असेच टोणगे, भ्रष्टाचारी, हत्याकांडातील आरोप, अंमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप स्वतःच्या पक्षात लागतात.”

राज्यात विरोधक राहिले बाजूला पण सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत स्पर्धा असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी दिसत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताज्या दिल्लीवारीनंतर महायुतीमधील वादावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली. शिवसेनेचे (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी महायुतीत चाललेल्या अंतर्गत संघर्षावर भाष्य केले आहे. यावेळी सरकारमधील लोकच एकमेकांच्या विरोधातील प्रकरणे बाहेर काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांमध्येच एकमेकांच्या नसा आवळल्या जात आहेत. आजच एक बातमी वाचली, ‘बाबा मला मारले, म्हणून कोणीतरी दिल्लीत गेला’. ही लाचारी कशासाठी, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मुंबईत ज्येष्ठ शिवसैनिकांच्या कार्यक्रमात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी लहान मुलाच्या तोतऱ्या आवाजात वरील वाक्य बोलत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आला. पहिल्यांदा हा घोटाळा झालाच कसा? झाला तर तो बाहेर आला कसा? कोणी बाहेर काढला? वर्षभरात असे अनेक घोटाळे बाहेर येत आहेत. मुख्यमंत्री सर्वांना क्लिन चीट देत आहेत. आरोप करणारे हेच आणि न्यायमूर्तीपण तेच. आधी केसेस काढून द्यायच्या. कुणाला तरी आरोप करायला लावायचे आणि मग हे क्लीन चीट देणार”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

पार्थ पवार प्रकरणावर बोलत असताना सरकारमधूनच प्रकरणे बाहेर दिली जात असल्याचा संशय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. ते म्हणाले, “प्रकरण बाहेर आल्यानंतर समोरच्याला दम द्यायचा. तुझी प्रकरणे बाहेर आली आहेत, तुमच्या लायकीत राहा नाहीतर ही टांगती तलवार डोक्यावर आहे.”