नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. तसेच संध्याकाळी 6 नंतरही त्र्यंबकेश्वरमधील एका मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांची रांग पाहायला मिळाली. आनंद आखाडा येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असून याच ठिकाणी 3 वेळा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. अनेक उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मशीनमध्ये बिघड झाल्यामुळे मतदान थांबल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रावर साडेपाचआधी आलेल्यांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली.
दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकींचा निकाल हा आधी बुधवारी 3 डिसेंबरला लागणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे 21 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यानंतर विजयी उमेदवार निश्चित होणार आहेत. जालन्यात जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या 18 तर नगरसेवक पदाच्या 232 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.भाजप नेते रावसाहेब दानवे,बबनराव लोणीकर, राजेश टोपे यांच्यासह नारायण कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.














