भाजपाकडून विरोधकांवर सातत्याने होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपावर खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “आमच्यावर घराणेशाहीचे आरोप होतात. मी तर आहे घराणेशाही. मला अभिमान आहे. ज्या आई-वडिलांनी मला जन्माला घातलं आहे, त्याच्या घराण्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही. आम्ही निवडणुकीत निवडून येतो. विरोधकांमध्ये अशी बरीच घराणी आहेत. पण त्याहून जास्त घराणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूला आहेत”, असं त्या म्हणाल्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलत होत्या.
नुकतीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा घेऊन मोठ्या प्रमाणावर दुहेरी मतदार, चुकीची माहिती अशा प्रकारांचे ढीगभर पुरावे सादर केले आहेत. या सर्व प्रकाराबाबत लोकसभेत आज सविस्तर चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परखड शब्दांत केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर आगपाखड केली.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सुप्रिया सुळेंनी आपण वोटिंग मशीनविरोधात काहीही बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. “मी इथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, बॅलेट या कशावरही बोलणार नाही. मीही त्याच मशीनवर निवडून आले आहे. जर त्या मशीनमध्ये काही गडबड असेल, तर सुरुवात माझ्यापासून व्हायला हवी. त्यामुळे मी मशीनविरोधात बोलत नाहीये”, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आणि भाजपाच्या दिशेनं मोर्चा वळवला. सुप्रिया सुळेंनी यावेळी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून घोटाळे चालू असल्याचं सांगितलं.
“पंचायत निवडणुका झाल्या तेव्हा आधी अर्जात गडबड, मग अर्ज माघारीमध्ये गडबड, मग आरक्षणात गडबड समोर आली. त्यांच्याच एका मित्रपक्षाच्या आमदारानं भाजपाच्या आमदारावर पैसे वाटल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या एका आमदाराने भाजपाच्या एका नेत्याच्या घरात छापा टाकून रोख रक्कम पकडली. माझ्याकडे पुरावे आहेत. अशी १० उदाहरणं मी सांगू शकते. पैसे वाटले गेले”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“आमच्याकडे महाराष्ट्रात तर निवडणूक आयोग अस्तित्वातच नाहीये. असला तरी आम्हाला माहिती नाही कुठे आहे. आम्ही जाऊन भेट घेतो तेव्हा त्यांनी मौन व्रत घेतलेलं असतं. एकही गोष्ट सांगत नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासात निवडणुकीत कधीच हिंसा झाली नाही. पण यावेळी बंदुका दाखवल्या गेल्या. कुणी कुणाला ते महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री सांगू शकतील. पण गाड्या फोडल्या, बंदुका दाखवल्या. ईव्हीएमची कुलुपं तोडली. मी पंतप्रधानांना सांगू इच्छिते की तुम्ही देशाला एक दिशा देत आहात, पण तुमचंच सरकार महाराष्ट्रात भलतंच काहीतरी करतंय”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी आपला संताप व्यक्त केला.
भाजपाकडून विरोधकांवर सातत्याने होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपावरदेखील सुप्रिया सुळेंनी स्पष्ट भूमिका मांडली. “आमच्यावर घराणेशाहीचे आरोप होतात. मी तर आहे घराणेशाही. मला अभिमान आहे. ज्या आई-वडिलांनी मला जन्माला घातलं आहे, त्याच्या घराण्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही. आम्ही निवडणुकीत निवडून येतो. विरोधकांमध्ये अशी बरीच घराणी आहेत. पण त्याहून जास्त घराणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूला आहेत”, असं त्या म्हणाल्या.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. बऱ्याच ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या. जे यात जिंकले, ते सगळे घराणेशाहीवाले होते. इकडे अगदी मोदींविरोधातही कुणीतरी निवडणूक लढवतंच. एक तरी विरोधक असायला हवा समोर. लोकशाहीसाठी ते महत्त्वाचं आहे. पण महाराष्ट्रात वेगळंच चित्र आहे”, असं सांगत सुप्रिया सुळेंनी काही उदाहरणंच सांगितली.
१. जामनेर – साधना महाजन – मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी
२. भुसावळ – रजनी सावकारे – मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी
३. खामगाव – अपर्णा फुंडकर – मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी
४. दोंडाईचा – मंत्री जयकुमार रावळ यांच्या आई जिंकून आल्या
५. यवतमाळ – प्रियदर्शनी उके – मंत्री अशोक उकेंच्या कन्या
६. चाळीसगाव – प्रतिभा चव्हाण – मंगेश चव्हाण यांच्या पत्नी
या सर्व ठिकाणी निवडणूक झालीच नाही. कुणाला अर्जच भरू दिले नाहीत. एक-दोन बिनविरोध समजू शकते. पण २५ ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “शिरूरमध्ये एक हजार मतं अशी आली ज्यांचे ना घरचे पत्ते आहेत ना इतर कसली ओळख. ही मतं आली कुठून याची माहिती मिळालेली नाही”, असंही त्यांनी सांगितलं.














