kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

प्रियांका गांधी ‘ते’ बोलल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे नेते खो खो हसले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरमने सुरू झालेली वादळी चर्चा शुक्रवारी वंदे मातरमनेच अखेर थांबली. निवडणूक कार्यक्रमातील सुधार, शक्ती आणि रामजी विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. अधिवेशन संपताच गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हरवलेला संवाद पुन्हा पाहायला मिळाला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी हजेरी लावली. यावेळी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला एकत्र बसलेले दिसले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत प्रियांका गांधी वाड्रा या विरोधकांचे नेतृत्व करताना दिसल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीही तीन देशांचा दौरा करून परत आल्यानंतर ते सर्वांबरोबर एकत्र बसून चर्चा करताना दिसले.

संसदेच्या प्रत्येक अधिवेशनानंतर लोकसभेचे अध्यक्ष सर्वांना चहापानासाठी निमंत्रित करतात. संसदेत विविध विषयांवर एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानंतर या चहापानाच्या कार्यक्रमात सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असतो.

समोर आलेल्या बातमीनुसार, चहापानाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथोपिया दौऱ्याची माहिती दिली. त्यांनी इथोपियाच्या राजधानीचे कौतुक करताना म्हटले की, ते शहर खूपच सुंदर आहे. यावर प्रियांका गांधीनींही सहमती दर्शवली. त्या म्हणाल्या, हो ते शहर फारच सुंदर आहे. अशा हलक्या फुलक्या वातावरणात चर्चेची सुरुवात झाली. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील निळ्या हळदीचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, मी हळदीचा नियमित वापर करत आहे. यामुळे गळ्याला आराम मिळतो. विशेष करून प्रदूषणापासून जो त्रास होतो, त्यापासून ही हळदी मुक्ती देते. प्रियांका गांधींच्या या वर्णनावर काही खासदार स्मितहास्य करताना दिसले, असे एबीपी न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी खूप कमी होता, असे म्हटले. अधिवेशन आणखी काही काळ चालायला हवे होते, असे ते म्हणाले. यावर पंतप्रधान मोदी स्मितहास्य करत म्हणाले की, घोषणाबाजी करायला अधिक काळ चालायला हवे होते का? यावर प्रियांका गांधींनीही संधी साधत म्हटले की, आम्ही घोषणाही देतो आणि भाषणेही ठोकतो. यानंतर बैठकीत उपस्थित असलेले सर्वच जण खळखळून हसले.