आम्हाला फक्त खुर्च्यांची चिंता असती, तर आम्ही भाजपसोबत गेलो असतो असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. पुण्यात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, मी आज पुण्यात येताना पुन्हा एकदा जाणवलं की ही परिस्थिती आता केवळ स्क्रीनवर पाहण्यासारखी राहिलेली नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यावर अनुभवाला येते. आज येतानादेखील एवढा ट्रॅफिक लागला की मला कधीच मुंबई–पुणे एवढं अंतर इतकं मोठं वाटलं नव्हतं. पण हे का होतंय, कशामुळे होतंय, याच्या खोलात जाणं गरजेचं आहे.
आदित्य ठाकरे आणखी काय काय म्हणाले ?
गेल्या दोन-अडीच वर्षांत मी जेव्हा जेव्हा पुण्यात आलो, वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन असो, नागरिकांशी संवाद असो, वेताळ टेकडी असो, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो किंवा इतर विषय असोत, प्रत्येक वेळी एक गोष्ट ठळकपणे जाणवली. पूर्वी पुणे इतक्या सहज पाण्यात बुडायचं नाही, इतकं पाणी तुंबायचं नाही. पण आता पाणी तुंबतंय, पूरस्थिती निर्माण होतेय आणि ही परिस्थिती वाढत चालली आहे.
साधारण सात–आठ वर्षांपूर्वी असं वाटायचं की हे शहर प्रगतीसाठी, वाढीसाठी संधी असलेलं, एक ‘आस्पिरेशनल सिटी’ आहे. पण आता तेच शहर कुठेतरी चोक व्हायला लागलं आहे का, असा प्रश्न पडतो. आणि ही कोंडी केवळ लोकसंख्येमुळे नाही. लोकसंख्या वाढणं हे नैसर्गिक आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन असतंच. पण प्रशासकीय आणि शासकीय कामं जी व्हायला हवी होती, ती अनेक वर्षे प्रलंबित राहिली आहेत.
मी परवा एका प्रेझेंटेशनमध्ये मुद्दाम सांगितलं होतं की मला आपल्या देशात एक तरी असं शहर दाखवा जे भाजपशासित आहे आणि जे खरोखर सुधारलेलं आहे. ज्या ज्या शहरांवर किंवा राज्यांवर भाजप सत्तेत आली, तिथे उलट दिशेने प्रवास सुरू झाला. त्यांच्या जाहीरनाम्यात ते काय दाखवतात आणि प्रत्यक्ष जमिनीवर काय असतं, यामधली दरी इतकी मोठी असते की ती कुठल्याही ‘मिसिंग लिंक’ने भरून निघू शकत नाही.














