महापालिकांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युतीची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (शिंदे) आणि भाजपावर खोचक टीका केली आहे.’राजकीय पक्षातील मुलं पळवणारी टोळी महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे’, असा टोला राज ठाकरेंनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला आहे. दरम्यान राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आपल्या शेलक्या शैलीत त्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत काय म्हणाले?
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत याचा मला आनंद आहे. पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काहीतरी घडेल असा जर कुणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. माझ्यासमोर टीव्ही सुरु होता म्हणून बघत होतो. काही माध्यमं असं दाखवत होती रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. झेलेन्स्की निघाले, पुतिन निघाले आणि युती झाली. मला वाटतं कुठल्याही पक्षाला अस्तित्व टिकवण्यासाठी जे करायचं असतं ते त्यांनी केलं. याने काही फार परिणाम होईल असं वाटत नाही. कारण मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलं आहे. त्यामुळे मराठी माणूस त्यांच्या बरोबर नाही. तर ज्यांच्यावर यांनी हल्ले केले असे अमराठीही यांच्याबरोबर नाहीत. मुंबईत कुणीही यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचार आणि स्वहिताचा आहे. “
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती म्हणजे भीती संगम आहे हा प्रीती संगम नाही. शिवाय व्हिडीओ काहीही बनवूदेत. अख्ख्या जगाला माहीत आहे देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी म्हणून जन्माला आला. हिंदुत्वातच जगतो आहे आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि मतांसाठी मत बदलणारे आम्ही नाही. असा टोला राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले?
“मला बाकी जे बोलायचं आहे ते जाहीर सभांमधून मी बोलेन. मात्र, मी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि तिथून आम्ही (मनसे-ठाकरे गट) एकत्र येण्याची सुरुवात झाली. आता कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात”, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला आहे.














