kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शरद पवार ठाकरे बंधूंची साथ सोडणार?

मुंबई महापालिकासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती जाहीर झाली असताना शरद पवारांची राष्ट्रवादीने ठाकरे गटासह काँग्रेससोबतच्या युतीचा पर्याय खुला ठेवला आहे. दरम्यान, काँग्रेसने मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसनंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंची साथ सोडून काँग्रेससोबत मुंबई महापालिकेची निवडणुक लढवणार की काय?, अशी चर्चा संध्या रंगली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे 31 जागा तर काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना 1997 पासून सत्तेत आहे, त्याआधी 1987 ते 1992 सेना सत्तेत होती. 1989 साली सेना-भाजप युती झाली पण 1992 च्या निवडणुका दोन्ही पक्षांनी वेगळ्या लढवल्या. त्यावेळी काँग्रेस सर्वाधिक 111 जागा मिळवत सत्तेत (1992 ते 1997) आली होती.

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम-

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026