kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अखेर मुंबईत महायुतीचं ठरलं! भाजपा 137 तर शिवसेना घटकपक्षांसह 90 जागा लढवणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील युतीच्या जागावाटपावर अखेर निर्णय झाला आहे. सोमवारी (29 डिसेंबर) रात्री उशिरा जागावाटपाबाबतची चर्चा पूर्ण झाली. त्यानुसार भाजपा 137 जागांवर, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि आरपीआयसह महायुतीमधील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ही माहिती दिली.

अमित साटम यांनी सांगितलं की, यापूर्वी 207 जागांवर चर्चा पूर्ण झाली होती. मात्र, आता 227 जागांवर अंतिम चर्चा झाली असून त्यानुसार भाजपा 137 जागांवर निवडणूक लढवेल, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवेल. महायुतीतील मित्र पक्षांचाही समावेश याच 227 जागांमध्ये करण्यात आला आहे.

भाजपाच्या वाट्याला एकट्याच्या 137 जागा आल्या असून, शिवसेनेच्या 90 जागांमध्ये इतर मित्र पक्षांना सामावून घेतलं जाणार आहे, असंही अमित साटम यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणतीही नाराजी नसून सर्वांना सामावून घेण्यासाठी वेळ लागल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, 90 जागांवर आम्ही समाधानी असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपासोबत झालेली जागावाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून योग्य फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 227 जागांवर महायुतीचे उमेदवार एकत्र निवडणूक लढवतील आणि 150 पेक्षा जास्त जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.