पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सत्तेत असलेले दोन राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेत सत्तेत आल्यास पुणे-पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना मोफत बस आणि मेट्रो प्रवास सुविधेचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवारांनी दिलेले हे मोफतचे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही हे पुणेकरांना माहिती आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत अजित पवार यांच्या मेट्रो तिकीट मोफत करण्याबाबतच्या विधानाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “खरंतर मी आज घोषणा करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमानं आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. घोषणा करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं घोषणा करायला?” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लगावला.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातील लोकं निवडणुका जिंकण्याच्या डेस्पिरेशनमध्ये, जेव्हा आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही. अशा स्थितीत आम्ही काही जाहिरनामे काढतो, त्या जाहिरनाम्यांमध्ये काहीही म्हणतो. तरीही माझं म्हणणं आहे की किमान लोकांचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हणल्या पाहिजेत, ज्या आपण करू शकू…”
मेट्रोचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन खरेच पूर्ण करणे शक्य आहे का? याबाबतही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टिकरण दिले. ते म्हणाले की, “मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाहीये. मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोच्या बॉडीचे अध्यक्ष हे केंद्रिय सचिव असतात आणि एमडी हे महाराष्ट्राचे असतात. दुसरं, कुठल्याही मेट्रोचे आपण फेअर फिक्सेशन करतो, त्यावेळी कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीलाच कायद्याने दिलेले अधिकार आहेत. उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं, तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे. ऑपरेशनल खर्चतरी निघाला पाहिजे. समाजा जर हा खर्च तुम्ही काढणार नसाल आणि सवलत द्याची असेल तर तुम्ही कुठून पैसे देणार हे सांगा,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासने देऊ नयेत असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुणेकर वेळेवर टॅक्स भरणारे लोकं आहेत. आता ऑनलाईनचा जमाना आहे. पण मी ते देखील बघीतले आहे जेव्हा लाईन लावून टॅक्स, विजेचे बील भरणारे केवळ या पुण्यात बघीतले आहेत. पुणेकरांना मोफत नकोय. पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवंय. पुणेकरांना उत्तम मेट्रो आणि बसची सेवा हवी आहे. या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ही त्यांची अपेक्षा आहे. आणि यासाठी किमान खर्च आहे तो पुणेकर देतील. त्यामुळे हे जे आश्वासन आहे ते आश्वासन आहे हे पुणेकरांना समजलं आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही हेही त्यांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.











