अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५.०० वाजता त्यांचा शपथविधी पार पडला. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. आज दुपारी २.०० च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
१९६३ मध्ये जन्मलेल्या सुनेत्रा यांनी ३८ वर्षांच्या अजित पवार यांच्याबरोबरील सहजीवनात राजकारणातील अनेक चढ उतार पाहिले आहेत. लोकसभेला स्वत: व मुलाचा पराभव पचवला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षात राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदार असल्या तरी सामाजिक कामाचा शुभारंभ त्यांनी सासरी कोटेवाडीतून केला. या आहेत त्यांच्या बाबतच्या खास बाबी.
१. सुनेत्रा पवार यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातले तेर.१८ ऑक्टोबर १९६३ रोजी त्यांचा जन्म झाला. बाजीराव पाटील हे त्यांचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण होत. छत्रपती संभाजीनगर येथील एस. बी. महाविद्यालय मधून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
२. शरद पवार यांच्या राजकारणातल्या सख्यातून सुनेत्रा आणि अजित पवारांचे लग्न ठरले. १९८० मध्ये सुनेत्रा या लग्न होऊन बारामतीला आल्या. प्रारंभी त्या अजित पवारांना त्यांच्या दुधाच्या व्यवसायात मदत करत होत्या.
३. मुंबईत झालेल्या १९८३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले. तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यात राहायला गेले.
४. अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू असलेले गाव दाखवले. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या मूळ सासरी गावी काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात केली.
५. काटेवाडीमध्ये ८० टक्के लोकांकडे शौचालयेही नव्हती. त्यातून आणि निर्मलग्राम आणि ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.
६. राज्यातील ८६ गावांमध्ये निर्मलग्राम मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले. काटेवाडी निर्मलग्राम तर झालेच शिवाय त्याचे इको व्हिलेज म्हणूनही त्यांनी रुपांतर केले. बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ही राबवला.
७. परिसरातल्या स्त्रियांना रोजगार मिळण्यासाठी बारामती मध्ये टेक्सटाईल पार्कला सुरुवात केली. जवळपास १५ हजार महिला या टेक्सटाईल पार्कमध्ये काम करतात. या टेक्सटाईल पार्कचे अध्यक्षपद २००६ पासून सुनेत्रा पवारांकडे आहे.
८. शरद पवार संस्थापक असलेल्या बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर त्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. येथे सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
९. पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यासाठी २०१० मध्ये त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून जलसंधारण आणि वृक्ष लावण्याची कामे केली जातात.
१०. दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकासकामांकडे लक्ष देत असले तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी सुनेत्रा पवार निभावत असायच्या. यामुळेच बारामती परिसरात ‘वहिनी’ ही त्यांची ओळख बनली.
११. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
१२. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. त्या जागेवर १३ जून २०२४ ला उमेदवारी अर्ज दाखल करत सुनेत्रा पवार खासदार झाल्या.
१३. जैवविविधता संवर्धन, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारण यावर लक्ष केंद्रित करून व्यापक तळागाळातील मोहिमा राबवण्यासाठी त्यांना प्रतिष्ठित ” ग्रीन वॉरियर अवॉर्ड ” ने सन्मानित करण्यात आले.
१४. २०११ पासून त्या जागतिक उद्योजकता मंच (फ्रान्स) च्या थिंक टँक सदस्य आहेत , शाश्वतता आणि सामाजिक नवोपक्रमावरील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारताचे त्या प्रतिनिधित्व करतात.
१५. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार व सायबर ग्राम पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
१६. पार्थ आणि जय असे त्यांना दोन मुलगे आहेत. पार्थने २०१९ मध्ये मावळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. जय हा कुटुंबाचे व्यवसाय पाहतो.












