kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला; ‘अमर रहे’ घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला!

महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (१२ डिसेंबर) परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गड ‘अमर रहे… अमर रहे… गोपीनाथराव मुंडे अमर रहे…’ या घोषणांनी दुमदुमून गेला. राज्यभरातून हजारो चाहते सकाळपासूनच गोपीनाथ गडावर दाखल झाले आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांनी विनम्र अभिवादन केले. संपूर्ण परिसर मुंडेसाहेबांच्या स्मृतीने भारलेला होता. यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी कृषिमंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडे, बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे आणि प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी एकत्र येत समाधीस्थळाचे दर्शन घेतले आणि भजन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांसह अनेक मान्यवर आणि मुंडेप्रेमींची गर्दी होती.

भजन कार्यक्रमानंतर उपस्थित मुंडेप्रेमींसमोर बोलताना मंत्री पंकजा मुंडे अत्यंत भावुक झाल्या. “लोकनेते गोपीनाथराव मुंडेंवर प्रेम करणाऱ्या जनतेला नतमस्तक होण्यासाठी स्थळाची गरज होती, म्हणून गोपीनाथ गड उभा राहिला. ही निर्मिती माझी नसून जनतेच्या प्रेमाची आहे.” त्यांनी पुढे वचन दिले, “आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही गोपीनाथगडावर येत राहू.” गोपीनाथरावांनी वंचितांसाठी आयुष्य घालवले, त्यांनी उभं केलेलं कार्य अधिक सुदृढ करण्यासाठी ईश्वर आम्हाला बळ देवो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.