‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचं घर नेमकं कसं असणार? हे पाहण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक खूप आतुर झाले होते. अखेर घराची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आलेली आहे. गार्डन एरिया, बाल्कनी, लिव्हिंग रूम, किचन एरिया, वॉशरूमचा परिसर, बेडरूम, कॅप्टन रूम, जिम-स्विमिंग पूलसाठी वेगळी जागा अशा सगळ्या सुविधांनी ‘बिग बॉस मराठी’चं घर परिपूर्ण आहे.
मात्र, यावर्षी घरात स्पर्धकांना धक्का देण्यासाठी काही ट्विस्ट असतील. यातील पहिला ट्विस्ट म्हणजे यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्यांदाच प्रेक्षकांना बंक बेड ही संकल्पना पाहायला मिळेल. आता बंक बेडवर वरच्या बाजूला राहणारे स्पर्धक त्यांचं सामान कुठे ठेवणार? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रसंगी यावरून वादही उद्भवू शकतात. पण, या बंक बेडची दुसरी बाजू अशी की, संपूर्ण बेडरूम एरियामध्ये काय चाललंय हे पाहता येतं. ही याची एक सकारात्मक बाजू आहे. आता घरात एन्ट्री घेतल्यावर बंक बेडची निवड कोण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यावर्षी ‘बिग बॉस’च्या घरात आणखी एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे टेलिफोन असं नाव दिलेली स्टोअर रूम. अशाप्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. आता या खोलीत स्पर्धकांना टेलिफोन उपलब्ध करून देतील का? की यावर फक्त चकवा देण्यासाठी टेलिफोन असा उल्लेख करण्यात आलाय असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहेत. याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील.
दरम्यान, आता ११ जानेवारीला ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचं दार उघडल्यावर शोमध्ये कोणकोणते ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या शोचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख आहे. ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन यावर्षी दररोज रात्री ८ वाजता प्रसारित केला जाईल.











