भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतो’, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या एका पुस्तकाचा दाखला देत हे विधान केलं आहे.
दरम्यान, ‘सिंध हा प्रदेश आज भारताचा भाग नसला तरी संस्कृतीनुसार तो नेहमीच भारताचा भाग राहील’, असं म्हणत लालकृष्ण आडवाणी यांच्या सारख्या नेत्यांनी सिंध प्रदेश भारतापासून वेगळं होणं हे कधीही स्वीकारलं नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं?
“मी आज या ठिकाणी लालकृष्ण आडवाणी यांचा देखील उल्लेख करू इच्छितो. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे की सिंधी हिंदूंनी विशेषतः त्यांच्या पिढीतील लोकांनी आजही सिंध प्रांत भारतापासून वेगळा होणं स्वीकारलेलं नाही. केवळ सिंध मध्येच नाही तर संपूर्ण भारतात हिंदू सिंधू नदीला पवित्र मानतात आणि सिंधमधील काही मुस्लिम देखील सिंधू नदीला पवित्र मानत होते. असंही म्हटलं जायचं की सिंधूचं पाणी मक्केच्या आब-ए-जमजमपेक्षाही कमी पवित्र नाही. हे आडवाणींचं वाक्य आहे”, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
“आज मी त्यांचा (आडवाणींचा) एक कोट सांगत आहे. आज सिंधची भूमी भारताचा भाग भलेही नसेल. पण सभ्यतेच्या दृष्टीने सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. आता राहिली गोष्ट जमिनीची, तर सीमा कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतं. सिंधू नदीला पवित्र मानणारे आपले सिंधचे लोक नेहमीच आपले असतील, मग ते कुठेही असले तरी”, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.














