गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले, “महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्या सर्वांशी सुप्रिया सुळे यांनी वैयक्तिक चर्चा केली. सर्व कार्यकर्त्यांनी घड्याळाबरोबर जाणं योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत”.
राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीसोबत जागावाटपासाठी चर्चा सुरू असताना असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती झाली.याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “महाविकास आघाडीसोबत आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात काही कार्यकर्त्यांशी चर्चादेखील सुरू होती. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे. आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही. आम्ही आमच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत.”
प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “प्रशांत जगताप चांगले पदाधिकारी होते. पण, त्यांनी असा निर्णय घेतला, याबाबत मी काही सांगणार नाही. त्याला खूप मोठी कारणे आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या 95 टक्के लोकांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्या सर्वांनी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येऊन निवडणूक लढवावी असे सांगितलं. ही कार्यकर्त्यांची लढाई असल्यानं त्याचं ऐकूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही कार्यकर्त्यांसाठी एकत्र आलो आहोत. सर्वत्र वेगवेगळी समीकरणं आहेत. उद्या, तुतारी आणि घड्याळाकडून एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. त्यानंतर कुणाला किती जागा मिळणार तेव्हा कळणार आहे. पिंपरीची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्याकडे आणि माझ्याकडे पुण्याची जबाबदारी आहे,” असं यावेळी पवार म्हणाले.
बारामती येथे उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले," आम्ही टाटांना भेटलो. आम्ही अदानींना भेटलो. ज्या लोकांकडून सीएसआरमधून मदत मिळते, लोकांच्या मदतीला धावून जातात, त्यांची आम्ही मदत घेत असतो. ते काही राजकारणासाठी आले नव्हते."











