पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५ हजार १०० कोटी रुपये असून त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील ५०:५० टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्रसरकार व राज्यशासन उचलणार आहेत. राज्य शासनाचा एकूण वाटा २ हजार ५५० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या हिस्स्यातील या २ हजार ५५० कोटींपैकी पुणे महानगरपालिका (२० टक्के) ५१० कोटी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (२० टक्के ) : ५१० कोटी, पीएमआरडीए (३० टक्के) ७६५ कोटी असा स्थानिक संस्थांचा सहभाग राहणार असून उर्वरित रक्कम राज्य शासन देणार आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच, पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.














