kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्येवर गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय ?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी संपता संपत नाहीयत. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मानपूर येथील एका जमीन खरेदी प्रकरणाने राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संबंधित तक्रार ही जमीन खरेदी प्रकरणाशी संबंधित आहे. 2002 मध्ये मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक 122 असलेली जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली खरेदी केल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराच्या मते, एकनाथ खडसे यांनी मूळ मालक चमेली बाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना चांगला आर्थिक मोबदला देण्याची तसेच साखर कारखान्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

एकनाथ खडसे यांच्याकडून तायडे कुटुंबाला 51 हजार रुपये देण्यात आले. यानंतर सर्वांचे कागदावर अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी करण्यात आली. यानंतर राहिलेल्या पैशांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील या कुटुंबाला देण्यात आलेला नाही, असा आरोप आहे.

अनेक वर्ष उलटून देखील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 या जागेवर साखर कारखाना उभारण्यात न आल्याचे पाहून तायडे कुटुंबाचे 2025 साली याबाबत माहिती घेतली असता त्यांना धक्का बसला. त्यांना ही जमीन शारदा एकनाथराव खडसे यांच्या नावाने करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे तायडे यांनी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी पुढील पडताळणी केली असता ही जमीन शारदा एकनाथराव खडसे यांच्या नावावर असल्याचे दिसून आले. यानंतर रिपाई पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान 11 फेब्रुवारी 2026 रोजी मूळ खरेदी खताची प्रत पाहिली असतात त्यात खाडाखोड करून खरेदी करणाऱ्यांच्या अर्थात तापी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या जागी शारदा एकनाथराव खडसे असे लिहिण्यात आल्याचे दिसले. शारदा खडसे या एकनाथ खडसे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. या खरेदी खताच्या पान क्रमांक तेरावर देखील खाडाखोड करून शारदा खडसे यांचे नाव टाकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानुसार 9 मार्च 2026 रोजी त्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांना चौकशीचे निर्देश दिले. या अनुषंगाने चमेलाबाई तुकाराम तायडे यांनी बोदवड पोलीस तालुक्यात फिर्याद दिली.