ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे बुधवारी (7 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये रात्री 11 वाजता त्यांचे निधन झाले. गुरूवारी (8 जानेवारी) संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अशी माहिती माधव गाडगीळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी दिली आहे. डिसेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.
माधव गाडगीळ हे पर्यावरणतज्ज्ञ असून, त्यांनी अनेक दशकांच्या संशोधन आणि सामाजिक कार्यातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न केले होते. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा आणि योजनांचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासण्यासाठी त्यांनी अनेक संशोधनं केली होते. संयुक्त राष्ट्रांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, डॉ. माधव गाडगीळ यांना लहानपणापासूनच समाजातल्या कनिष्ठ स्तरात राहणाऱ्या व्यक्तींच्या हक्कांचं महत्त्व त्यांना कळलं होतं.
माधव गाडगीळ यांचे वडील धनंजय गाडगीळ हे अर्थतज्ज्ञ होते. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये मानाचं स्थान स्थान मिळवलेल्या गोखले इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक संचालक होते.













