भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक त्सुनामी आणणाऱ्या धुरंधर या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची प्रतीक्षा आता संपली आहे. अभिनेता रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित ‘धुरंधर 2 – द रिव्हेंज’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर मंगळवारी (3 फेब्रुवारी 2026) दुपारी 12.12 वाजता रिलीज करण्यात आला. “ये नया हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी,” यांसारख्या अंगावर शहारे आणणारे डायलॉग असलेल्या या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
काय आहे टीझरमध्ये?
1 मिनिट 12 सेकंदांच्या या टीझरमध्ये पहिल्या भागातील स्टोरीचा पुढचा प्रवास दाखवण्यात आला आहे. पहिल्या भागात रहमान डकैत (अक्षय खन्ना) याला मारल्यानंतर ‘हमजा’ (रणवीर सिंह) कशाप्रकारे ल्यारीवर आपली सत्ता गाजवतो, याची झलक यात दिसते. विशेषतः ‘जसकीरत सिंह रंगी’चे हमजाच्या रूपात झालेले ट्रान्सफॉर्मेशन हा टीझरचा सर्वात लक्षवेधी भाग आहे. चाहत्यांना टीझरमध्ये नवीन सीन्स कमी असल्यामुळे थोडी निराशा वाटली असली, तरी एकूणच वातावरणाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
‘धुरंधर 2’ मध्ये पहिल्या भागातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. यात हमजाच्या पाकिस्तानमधील सीक्रेट मिशनवर अधिक प्रकाश टाकला जाईल. अजय सान्याल (आर. माधवन) याने नेमके का आणि कसे जसकीरतला हमजा बनवून पाकिस्तानात पाठवले? त्याची खरी ओळख काय आहे? हे गूढ या भागात उकलणार आहे. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, दुसरा पार्ट पहिल्या पार्टपेक्षा 50 पटीने अधिक रोमांचक आणि ॲक्शनने परिपूर्ण असणार आहे.
आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच आर. माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि दानिश पोदार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या भागात अक्षय खन्नाच्या कामाचे मोठे कौतुक झाले होते, त्यामुळे आता दुसऱ्या भागात आर. माधवन आणि रणवीर यांच्यातील जुगलबंदी पाहणे रंजक ठरेल. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरात रिलीज होणार आहे.













