लेखक-दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर चित्रपटाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या महिन्यातच जागतिक बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय स्पाय थ्रिलर असलेल्या या चित्रपटाला भारतातून जोरदार प्रतिसाद तर मिळत आहे. पण चित्रपटावरून राजकारण झालेलेही पाहायला मिळत आहे. अनेकांनी चित्रपटात राजकीय प्रोपगंडा असल्याचा दावा केला. तर त्याच्यावर चित्रपटाच्या समर्थकांकडून प्रतिदावे करण्यात आले. या चर्चेत आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात प्रोपगंडाबद्दल त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी रणवीर सिंह, अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेल्या धुरंधर चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक आदित्य धर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.
मी या चित्रपटात नाही तरी मला चित्रपट पाहून खूप समाधान आणि आनंद मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “माझी या चित्रपटात भूमिका नाही. मी चित्रपटाशी संलग्न नसलो तरी का कोण जाणे पण या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद आणि यश पाहून माझाही उर भरून येत आहे. तसेच मला अभिमानही वाटत आहे. आदित्य धरच्या यशाचा मला अत्यानंद होत आहे”, अशा शब्दात अनुपम खेर यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांचे कौतुक केले.
आदित्य धरबाबत बोलताना अनुपम खेर पुढे म्हणाले, “मला तो आवडतो. तो कश्मीरी आहे म्हणून किंवा त्याच्या कुटुंबानेही यातना भोगल्या म्हणून नाही. तर त्याने त्याच्या कामाने सर्वांना आपलेसे केले आहे. या चित्रपटातून त्याने अतुलनीय धाडस दाखवले आहे. त्याने चित्रपट निर्मितीचे पारंपरिक सूत्र वापरले नाहीत. हा चित्रपट पूर्णपणे आदित्य धरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार आहे. त्याचा दृढनिश्चय यातून दिसून येत आहे.”
धुरंधरवर झालेली टीका आणि त्याला प्रोपगंडा फिल्म म्हणणाऱ्यांवरही अनुपम खेर बरसले आहेत. ते म्हणाले, “चित्रपटाला प्रोपगंडा म्हणून हिणवणाऱ्यांचा एक गट कार्यरत होता. याच गटाने माझ्या द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटाच्या विरोधात प्रचार केला. त्यात ते यशस्वी झाले. द कश्मीर फाइल्स चित्रपटाविरोधातही हा गट सक्रिय होता. यात ते ३० टक्के यशस्वी झाले. पण धुरंधरने प्रोपगंडा प्रोपगंडा म्हणणाऱ्या गटाला चोख प्रत्युत्तर दिले असून त्यांना जबर चपराक लगावली आहे.”
प्रोपगंडा म्हणजे काय? हे आम्हाला सांगू नका, अशी अप्रत्यक्ष प्रतिक्रिया प्रेक्षकांनी चित्रपटाला यश देऊन दिली असावी, असेही अनुपम खेर म्हणाले. कोणता चित्रपट प्रोपगंडा आहे आणि कोणता फक्त चित्रपट आहे, हे इतरांनी सांगण्याची गरज नाही. प्रेक्षकांना खुजे समजण्याची चूक कुणीही करू नये. काही लोक स्वार्थासाठी कलेला कमी लेखतात. पण एखादी कलाकृतीही कधीतरी अशाप्रकारे प्रत्युत्तर देते, असेही ते म्हणाले.











