मागील दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर सुरुवातीला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. १२ नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबीयांच्या विनंतीवरून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या जुहूतील राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचीही माहिती मिळत होती. अखेर आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली आणि देशभरातील त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी सिनेसृष्टीसह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्यावेळी आपण आतमध्ये उपस्थित होतो असं आठवलेंनी सांगितलं.
रामदास आठवले म्हणाले की, “आज सकाळीच मला माहिती मिळाली की धर्मेंद्र यांचे निधन झालं. मी मोदी सरकार मधला मंत्री म्हणून लगेचच येथे आलो. धर्मेंद्र हे खासदार असताना २००४ ते २००९ च्या दरम्यान अनेकदा संसदेत भेटायचे. आमची चांगली ओळख होती. हेमामालिनी यांच्यासोबतसुद्धा मी खासदार असल्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा अनेकदा भेटी होतात. त्यामुळे सिनेसृष्टीतील या अभिनेत्याच्या बाबतीत माझ्या अनेक आठवणी आहेत.”














