अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर मोठा संयुक्त हल्ला केला आहे. इराणमधील विविध 30 लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितलं की ‘हा इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला होता.’
शनिवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाबाबत सरकारनं तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तेहरानच्या अणुकार्यक्रमावरून इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढलेला असताना हा स्फोट झाला. हल्ल्यानंतरच्या काही दृश्ये इराणमधील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यामध्ये धुराचे प्रचंड लोट आकाशात उठताना दिसत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
इस्रायलच्या सुरक्षा दलांनी सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती शेअर केली. त्यात म्हटलं आहे की, “गेल्या काही मिनिटांत संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवण्यात आले होते आणि सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्याच्या आगाऊ सूचनांसह सेल्युलर उपकरणांना थेट अलर्ट देण्यात आला होता.”
परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आज (शनिवार) सकाळी आठ वाजल्यापासून होम फ्रंट कमांड मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तत्काळ सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांमध्ये देशातील सर्व क्षेत्रांना पूर्ण क्रियाकलापातून अत्यावश्यक क्रियाकलापांमध्ये रूपांतरित करणे समाविष्ट आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक क्षेत्रे वगळता शिक्षण, मेळावे आणि कामाच्या ठिकाणी निर्बंध समाविष्ट आहेत. अधिकृत होम फ्रंट कमांड चॅनेलवर प्रकाशित मार्गदर्शक तत्त्वांचं जनतेनं पालन केलं पाहिजे. संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीय आपत्कालीन पोर्टल आणि होम फ्रंट कमांड ऍपवर अपडेट केली जातील. इस्रायलमध्येही त्यामुळे आणीबाणी सदृष्य परिस्थिती असून राजधानी तेल अविवमधून उड्डाण करणारी सर्व विमाने रद्द केल्याचं ही वृत्त आहे.
भारतानंही या सर्व परिस्थितीची दखल घेतली असून इस्रायल तसंच इराणमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच इस्रायल आणि इराणचा प्रवास टाळण्यासंबंधीही इशारा देण्यात आला आहे.
अणू करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर शनिवारी अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला. यानंतर इराणकडून देखील प्रतिहल्ले करण्यात आलेत. असं असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तीन विमानं रद्द करण्यात आली आहेत. पुणे विमानतळ प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुणे ते दुबई एसजी 51, आयएक्स 283 पुणे ते अबुधाबी आणि 6ई 1484/1483 दुबई-पुणे-दुबई ही तीन विमानं रद्द करण्यात आली आहेत. बाबत प्रवाशांना कळवले आहे.












