जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं (एलडीपी) रविवारी झालेल्या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे पंतप्रधान सानाइ ताकाइची यांना त्यांचा धोरणात्मक अजेंडा पुढे नेण्यासाठी निर्णायक जनादेश मिळाला, असे स्थानिक माध्यमानं म्हटलं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, ” “प्रतिनिधी सभागृहाच्या निवडणुकीत मिळालेल्या तुमच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन, साने ताकाइची! विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली, आम्ही भारत-जपान मैत्रीला आणखी उंचीवर नेत राहू, असा मला विश्वास आहे.”
६५ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात ३१० जागांपैकी दोन तृतीयांश बहुमते लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं (एलडीपी) मिळविली. त्यामुळे जपानच्या संविधानात सुधारणा करण्याची आणि कायदे मंजूर करण्याची परवानगी मिळाली आहे. अनेक वर्षानंतर प्रथमच जपानमध्ये एखाद्या पक्षाला एवढे प्रचंड बहुमत मिळालं आहे. या प्रचंड विजयामुळे पक्षाची निवडणूकपूर्व संख्या १९८ जागांवरून लक्षणीयरीत्या वाढली. ताकाइची यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेमुळे पक्षानं विजय मिळविल्याचं मानण्यात येत आहे. एलडीपी आणि त्यांचा युती भागीदार, जपान इनोव्हेशन पार्टी यांची (जेआयपी) एकत्रितपणे सभागृहातील सदस्य संख्या वाढणार आहे. “निवडणूक मोहिमेदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर सातत्यानं लक्ष केंद्रित करण्याची मोठी जबाबदारी आहे,”असे ताकाइची यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीने नव्याने स्थापन झालेल्या मध्यमार्गी सुधारणा आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जागा पूर्वीपेक्षा निम्म्या झाल्या आहेत. त्यांचे सह-नेते, योशिहिको नोडा आणि तेत्सुओ सैतो यांनी पराभवानंतर राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. सतत वाढत चाललेली महागाई आणि बिघडत चाललेले आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे वातावरण या पार्श्वभूमीवर ताकाइची यांनी जपानच्या संरक्षण क्षमता मजबूत करताना आर्थिक धोरण अवलंबण्याचं आश्वासन दिलं आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेचा दबाव असल्यानं सरकारनं कर कपात पुढे ढकलली आहे. सत्ताधारी पक्षानं सरकारच्या करांचा भार कमी करू, ही आश्वासने देत प्रचार केला. बिघडत्या सुरक्षा वातावरणात सत्ताधारी आघाडीनं वाढीव संरक्षण खर्चासाठी जनतेकडून पाठिंबा मागितला होता.













