आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून BMC निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही. यामुळे ठाकरे गटात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नगरसेवक नाराज झाल्यास ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे आता या संभाव्य निर्णयाचे ठाकरे गटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नसली तरी माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरु आहे. यामुळे पक्षात नवे व जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे किमान 70 टक्के नवे चेहरे उमेदवार असतील. त्यानुसार मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी रणनीती आखत आहेत.














