kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शक्तीपीठ महामार्गासाठी 20,787 कोटींची तरतूद ; नागपूर ते गोवा हे अंतर आता 8 तासांवर येणार

महाराष्ट्राच्या शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने तब्बल 20,787 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी ( जि.सिंधुदुर्ग ) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या खर्चाला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग जोडणार आहे. पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ आणि परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे.

हुडकोकडून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता 12 हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून सुमारे 7 हजार 500 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असून, त्यातून पर्यटन, वाहतूक आणि ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.