kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा- आमदार प्रवीण दरेकर

हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. कोकणातील, विशेषतः राजापूरच्या हळदीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सदस्य हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनात अग्रेसर असून, तेथील संशोधन केंद्र अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले.

या चर्चेत सहभागी होत आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकणातील हळद उत्पादकांचे प्रश्न मांडले. दरेकर म्हणाले की, “हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन होते आणि तिथले केंद्र मजबूत झालेच पाहिजे. मात्र, त्याच वेळी कोकणातील राजापूरची हळद देखील अत्यंत प्रसिद्ध आणि गुणकारी मानली जाते. जर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे एक उपकेंद्र कोकणात सुरू झाले, तर तिथल्या हळदीच्या उत्पादनाला शास्त्रीय जोड मिळेल आणि उत्पादनात मोठी वाढ होईल.”

आमदार दरेकर यांनी फलोत्पादन मंत्र्यांनी या उपकेंद्राची तातडीने घोषणा करावी, अशी मागणी सभागृहात लावून धरली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, कोकणात हळद संशोधन उपकेंद्र सुरू करण्याच्या आमदार दरेकरांच्या मागणीचा सरकार निश्चितपणे विचार करेल. सरकारच्या या आश्वासनामुळे कोकणातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.