महाराष्ट्रामध्ये असलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) यांचे दसरे मेळावे कसे होतील याकडे मराठी माणसाचे लक्ष लागले होते. सौम्य पाऊस सुरू असतानाच दोन्ही शिवसेनेंचे दसरा मेळावे पार पडले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोरेगावच्या नेस्को सेंटरहून आपल्या समर्थकांना संबोधित केले. उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे मुद्दे मांडले ते खोडून काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी भाषणातून केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा आपण केवळ मुंबई आणि ठाण्यातील शिवसैनिकांपुरता मर्यादित केला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. माझा बळीराजा संकटात आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यामुळे यावेळी आपण त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या शेतकरीबंधूंना मदत करण्यासाठी तिकडेच थांबायला सांगितलं. त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा, असं त्यांना सांगितलं आहे. बळीराजाचं दुःख मोठं आहे. त्यांची शेती वाहून गेली आहे, पशुधन गेलं आहे, घरं पडली आहेत, मी बांधा-बांधावर जाऊन आलोय. त्यांचं दुःख मी डोळ्यात पाहिलं आहे. अशावेळी त्यांना मदत केली पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र दिला होता. तो मूलमंत्र मी कधीच सोडणार नाही. अनेक शिवसैनिक तिथं मदत करत आहेत. तिथे मदतीच्या गाड्या जात आहेत. जिथे आपत्ती तिथे शिवसेना आहे. जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा-जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा शिवसेना धावून जाते. ही आपली जबाबदारी आहे. महापुरामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे. पण आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. सरकार त्यांच्या मागे आहे. कोणत्याही अटी-शर्थीशिवाय कुठल्याही परिस्थिती बळीराजाला मदत केली पाहिजे, हे महायुती सरकारने ठरवलं आहे.
संकट मोठं आहे. अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती. यंदाच्या दसऱ्यावर पुराचं मोठं सावट आहे. या संकटात बळीराजाच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी पाठ थोपटली असती. पाऊस वैऱ्यासारखा कोसळला आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
आयाबहिणींनो धीर सोडू नका, मी देखील शेतकरी आहे. शेतकऱ्यांचं दुःख मला माहीत आहे. पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वीच त्यांना मदत दिली जाईल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
कपड्यांची इस्त्री न मोडता, व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि वर्क फ्रॉम होम काम करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्ती काळात घरात बसून काम करणारा शिवसैनिक असूच शकत नाही.
बाळासाहेब म्हणायचे संकटात शिवसैनिक घरात नव्हे तर लोकांच्या दारात पाहिजे. त्यामुळे आपला शिवसैनिक घरोदारी मदत घेऊन फिरतोय. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे.
मदतीचं किट देताना त्यावरील फोटो दिसतात पण त्यातील सामान त्यांना दिसत नाही. त्या किटमध्ये 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आम्ही दिल्या आहेत. तुम्ही एकतरी बिस्किटचा पुडा घेऊन दिला आहे का? तेवढी तरी दानत दाखवायची. फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार? फोटोच दिसणार ना…
आधी आम्ही कार्यकर्ते तुमचे फोटो लावून मदत करत होतो, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं. काही लोकं गेले, फक्त नौटंकी करून आले. पण आम्ही जायच्या आधी तिथे मदतीचे ट्रक गेले आणि मग हा एकनाथ शिंदे तिथे गेला. ही आमची पद्धत आहे. मी फक्त एवढंच सांगतो की, यांचे दौरे म्हणजे…’खुद को चाहिए काजू-बदाम, पानी में उतरो तो सर्दी जुकाम’.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, कुठंही गेलं की माझ्या हातात काय आहे असं म्हणतात. जेव्हा हातात होतं, तेव्हाही दिलं नाही, आताही देत नाही आणि उद्याही देणार नाही. द्यायला दानत लागते.
मी मुख्यमंत्री असताना सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो. मी आता उपमुख्यमंत्री म्हणजे डीसीएम आहे. याचा अर्थ डेडिकेटेड टू कॉमनमॅन आहे. माझी सर्वसामान्य माणसांशी बांधिलकी आहे.
एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत. त्यानं कधीच म्हटलं नाही की माझे हात रिकामे आहेत. हे शिवसैनिक माझे ऐश्वर्य आहे, ही माझी संपत्ती आहे. संपत्तीचा मोह मला नाही. प्रॉपर्टीचाही नाही. प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती आहे. एकनाथ शिंदेनं दिलेलं या हाताचं त्या हाताला सांगितलं नाही.
यांनी 30 वर्षे मुंबई महापालिका ओरबडून घेतली. कुठं गेली एवढी माया? लंडनला का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल विरोधक खोट्या अफवा पसरवत आहेत. पण ही योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये एवढं काम केलं म्हणूनच महायुतीचे तब्बल 232 आमदार विजयी झाले. आता बळीराजाला सर्व निकष बाजूला ठेऊन मदत केली जाईल.
2014 ला मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला. आपल्या राज्याला इतका निधी यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेतून महाराष्ट्राला 46 हजार कोटी रुपये दिले. राज्यानेही वर्षाला यासाठी पैसे दिले. ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता. त्यावेळी अमित शहा यांनी 10 हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफकेला.
मोदी सरकारने 2014 पासून महाराष्ट्राला 10 लाख कोटी रुपये दिले आहेत. वाढवण बंदर, अटल सेतू योजना, नवी मुंबईचं विमानतळ, मेट्रो 3 प्रकल्प. त्याला केंद्रानेच मदत केली आहे.
महाबिघाडीचं सरकार असतं आणि हे मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) तर यातील कोणतीच योजना सुरू झाली नसती. सर्व ठप्प झालं असतं. हे स्थगित सरकार नाही तर प्रगती सरकार आहे.
मी पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सर्व स्थगिती हटवली. त्यावेळी सर्व प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती ते आधी सुरू केलं. विकास प्रकल्प सुरू केले. अडीच वर्षात इतकं काम केलं की दुसरी इनिंगही सुरू झाली. आता फडणवीस यांची टीमही तितक्याच जोमानं काम करत आहे.
पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरनंतर विदेशात जे शिष्टमंडळ पाठवलं त्याचं नेतृत्त्व करण्याचं काम मोदींनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिलं. तामिळनाडूमध्ये जेव्हा दुर्घटना घडली तेव्हाही त्यांनी श्रींकात शिंदे यांना पाठवलं. मिलिंद देवरा यांनाही परदेशात पाठवलं होतं. आपल्या देशाची सेवा करण्याची संधी देखील पंतप्रधान मोदी देतात.
राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात. हे देशप्रेम आहे का? हीच देशभक्ती आहे का? सावरकरांवर जे टीका करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि हिंदुत्त्वाबद्दल बोलता. तुमचं हिंदुत्त्व बेगडी आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबद्दल मूग गिळून गप्प बसता. तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
हिंदुत्त्व हा काही टी शर्ट नाही. 2019 ला तुम्ही काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हाच तुमचं हिंदुत्त्व सुटलं. जेव्हा मुख्यमंत्री पदाची खूर्ची पाहिजे होती तेव्हा तुम्ही त्यांचे विचार सोडले. एका खुर्चीसाठी सगळं घालवलं.
आम्हाला कोणीतरी सांगितलं की, आमचा दसरा मेळावा सूरतला घ्या. पण सूरत तर भारतात आहे. पण तुम्ही तुमचा दसरा मेळावा पाकिस्तानला घ्या आणि असिम मुनीरला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवा.
पक्षाचा प्रमुखच पक्षातील लोक संपवण्यासाठी काम करणारा हा जगातील पहिला पक्षप्रमुख असेल अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला. त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी कारस्थान केलं. ते कधीच आत्मपरीक्षण करणार नाहीत. हजारो-लाखो लोकं चुकीचे आणि एकच माणूस कसा बरोबर, असा सवाल त्यांनी केला. आता पक्षाची परिस्थिती काय आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची सावली देखील त्यांच्याबरोबर राहिल की नाही याची शंका वाटते.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाला तोडणार अशा चर्चा हे सुरू करतात. पण कोणाच्याही सात पिढ्या खाली आल्यातरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचीच राहणार आहे.
आता निवडणुकीसाठी यांचं प्रेम ऊतू चाललंय. पण तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. बाहेर गेलेला मुंबईकर मराठी माणूस पुन्हा इकडं आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे.
मुंबईत अनेक प्रकल्प पुढे नेत आहोत. रमाबाई आंबेडकर नगर प्रकल्प पुढे नेतोय, सर्व रस्ते क्राँकिट करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विकासात क्रमांक एकवर आहे. परदेशी गुंतवणुकीत आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. इथल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे.
यूपीए सरकारने 10 वर्षांत भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. 2014 नंतर मोदींनी सत्तेवर येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकलं. देश पुढे चालला आहे. जगात आता चौथ्या क्रमांकावर आहे. मोंदीवर आतापर्यंत एकही आरोप झालेला नाही. ते ‘बेदाग’ पंतप्रधान आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी राज्याच्या विकासासाठी पैसे आणायला दिल्लीला जातो. 10 जनपथला मुजरा करायला जात नाही. मोदींनी धडाकेबाज निर्णय घेतले. मोदींनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं.
मुंबईतील 40 लाख झोपडपट्टी धारकांना घर देण्याचं बाळासाहेबांचचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करणार आहे. गिरणी कामगारांना घर देण्याचं काम महायुती करणार आहे. लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आता स्थानिक स्वराज संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे, नाहीतर जी मुंबई पुढे जात आहे, ती पुन्हा 25 वर्षे मागे जाईल. अडीच वर्षात मुंबईसाठी जे आपण काम केलं आहे, ते पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. कोण कोणाशी युती करतो, कोणाचं मनोमिलन होतंय याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा हिशोब मी बघतो.
त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. संघाचे हेच लोक संकटात मदतीला धावून येतात. ते समर्पित भावनेनं का करतात. त्यांच्या संघटनेला 100 वर्षे झालीत. राष्ट्रभक्ती, देशभक्ती जागृत करण्याचं काम संघानं केलं आहे. शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबतही भाष्य केलं. त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर मतभेद विसरून स्थानिक स्वराज निवडणुकीत भगवा महायुतीची सत्ता येण्यासाठी कष्ट करण्याचा सल्ला दिला.
त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भात ज्यांच्या आयुष्यात आता नैसर्गिक संकट आलं आहे. त्यांच्या मुलांची लग्नं ठरली असतील तर त्यांची सर्व जबाबदारी शिवसेना घेईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. माझ्याकडे देण्यासाठी दोन हात आहेत, ते रिकामे नाहीत. बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतल असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं.
पुढील वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेना हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरा करणार असल्याची त्यांनी घोषणा केली.











