आमदार संजय गायकवाड हे नेहमीच चर्चेत असतात. संजय गायकवाड हे सद्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. सध्या शीळ जेवण दिल्याने त्यांनी एका कॅन्टीनवाल्याला चोपलं असल्याचं समोर आलंय. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांच्या या व्हिडीओनंतर आता आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण अंजता कॅटर्स हे अनेक वर्षांपासून ते कॅन्टीन चालवत आहेत. मुदत संपल्यानंतर ही पाच वर्षांपासून हे कॅटर्स का सुरु आहे. त्यामुळे नियमांना बगल देत अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय असलेल्या कॅटर्सवर सरकार मेहरबान असल्याचं बोललं जात आहे.
आमदार संजय गायकवाड काय म्हणाले ?
हा सर्व वाद जेवणावरुन झाला असून शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले. या सगळ्या वादावर आपली भूमिका मांडताना संजय गायकवाड म्हणाले की, “इथे साडेपाच वर्ष मी मुंबईला येतोय. मी सहसा कधी बाहेर जेवायला जात नाही. मी रात्री 9.30 वाजता डाळ, वरण, भात, चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर मला खूप घाणेरडं वाटलं”
“दुसरा घास खाल्ल्यावर उलटी झाली. वरणाला खूप भयंकर वास येत होता. पॉयजन सारखा हा प्रकार होता. भात शिळा होता. याआधी तीन वेळा असं जेवण आल्यानंतर मी मालकाला समज दिली. निकृष्ट जेवण घेऊन पार्सल घेऊन गाडीत बसतो. सकाळी गावी पोहोचल्यावर खूप अस्वस्थ वाटतं” असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.
“प्रवासामुळे नाही, तर हे जेवणामुळे होतं. हे फक्त आमदाराच्याच जीवाशी खेळत नाहीयत, तर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी इथे येत असतात. कोणाच्या जेवणात सुतळी, पाल मिळते. मग्रुरीच काम चालू आहे. 10 दिवसापूर्वीचा शिळा भात आणि वरण दिलं. अशावेळी या लोकांची पूजा करायची का?” असा सवाल संजय गायकवाड यांनी विचारला. “जे वरण दिलं, ते चार-पाच दिवसापूर्वीच आहे. तुम्ही वास घेऊन पाहू शकता. वारंवार सांगून हे ऐकत नसतील, मराठी-हिंदी समजत नसेल, तर आम्हाला आमच्या स्टाइलमध्ये उत्तर द्यावं लागेल. अशा प्रकारे आमदारांच्या, जनतेच्या जिवाशी खेळणारे कॅन्टीनवाले असतील, तर गय करणार नाही” असा इशारा गायकवाड यांनी दिला.
“आमदार या ठिकाणी रहातात, त्यांना असं जेवण दिलं जातं. शेतकरी, अधिकारी इथे येतात. मी नंतर विचारलं कुक, मॅनेजर कोण आहे? त्याने वास घेतला, खूप घाण वास येत होता. मग, त्यांना चांगला, आपल्या स्टाइलमध्ये प्रसाद दिला. साऊथ मधल्या लोकांना हे कॅन्टीन चालवायला दिलं आहे, तेच हे काम चालवतात” असं संजय गायकवाड म्हणाले.
आमदार निवासातील ‘राडा’ प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस कॅन्टीनमध्ये दाखल झाले. चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.














