kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांचे निवेदन

राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी, प्रशासनाची ढिसाळ तयारी आणि परिणामी विद्यार्थ्यांना व पालकांना भेडसावणाऱ्या मानसिक त्रासाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सविस्तर निवेदन ईमेलद्वारे पाठवले आहे.

७ जून २०२५ पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला. मात्र, पहिल्याच दिवशीच वेबसाईटवरील तांत्रिक बिघाडामुळे अनेक विद्यार्थी अर्ज सादर करू शकले नाहीत. परिणामी गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या वेळापत्रकात गोंधळ निर्माण झाला. या प्रक्रियेमध्ये बारकाईने पूर्वतयारी नसल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे, ‘लाडके विद्यार्थी योजना’ लागू करण्यासंबंधीची मागणी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे. या योजनेच्या अभावामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याचा खर्च झेपत नाही, यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर ॲड. मातेले यांनी सरकारकडे खालील मागण्या ठेवल्या आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः मोफत करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा अर्ज करताना होणारा आर्थिक भार कमी होईल. ‘लाडके विद्यार्थी योजना’ तातडीने लागू करावी, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक आधार मिळेल. स्वतंत्र तांत्रिक पथकाची नियुक्ती करावी, जे वेळीच अडचणी सोडवेल व पालक-विद्यार्थ्यांना समुपदेशन करेल. शिक्षण संचालनालयाच्या गलथान कारभाराबाबत जबाबदारी निश्चित करावी व दोषींवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी.विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा करून पुढील सुधारणा कराव्यात, जेणेकरून अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण होईल.

अकरावी प्रवेश ही केवळ एक प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वळण निश्चित करणारी बाब आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुधारणा कराव्यात, ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरद पवार पक्षाची स्पष्ट भूमिका आहे.