kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी (शप) गटाचे नेते राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक; जयंत पाटील यांनी केला हल्ल्याचा निषेध

बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले. रात्री नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर काल अहिल्यानगर येथील मंदाली गावातील एका हॉटेलजवळ अनोळखी व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो.

रामभाऊ खाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनातील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा पर्दाफाश करत आहेत. मध्यंतरी त्यांनी आष्टी तालुक्यातील विविध देवस्थान इनाम जमिन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्यांच्या व‌ त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका होता. म्हणून मी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाडे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. तसेच न्यायालयानेही त्यांना पोलिस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली याची माहिती नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे.

सरकारच्या भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला अशा प्रकारे संपवण्याचे काम केले जात असेल तर महाराष्ट्र पुरोगामी राज्याच्या प्रतिमेला हे शोभणारे नाही. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी.