सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक यासह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणार्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.











