kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार असून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं,” असं ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांचे आभार मानले. मंत्रिमंडळात सध्या दोन जागा रिक्त आहेत. यापैकी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिकामी झाली होती. आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार आहे. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा हेच खातं सोपविलं जाणार आहे.

शपथविधीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. मी लासलगाव, येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो. मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो. हे सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं. तेव्हा आमची मिटींग झाली होती. तेव्हाच सगळं ठरलं होतं. आधी सोमवारी शपथविधी होणार असं ठरलं होतं. परंतु मंगळवारी सर्व मंत्री असतील म्हणून आजचा दिवस ठरवण्यात आला.” यावेळी त्यांना उशीर झाला का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं” हीच प्रतिक्रिया पुन्हा दिली.

महाराष्ट्रातील एक प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या भुजबळांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. नाशिकमधील येवला इथले आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने जनतेत निराशा पसरली होती. त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या सरकारांमध्ये उपमुख्यमंत्रीपदासह कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केलं आहे. धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आलं होतं. या प्रकरणानंतर मुंडेंनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता.