नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केलं. महात्मा गांधी यांची आज जयंती असून त्यांचं स्वातंत्र्यलढ्यातलं महत्त्व अतुलनीय आहे असंही ते म्हणाले. पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं गेलं. आपल्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मोहन भागवत यांनी विविधतेत सामाजिक एकतेबद्दल बोलताना म्हटलं की, समाजात विविधता ही अनेक भांडी एकत्र असल्यासारखं आहे. त्यामुळे भांड्याला भांडं लागणार. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली आहे.
समाजातील एकतेबाबत बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, देशाच्या विकासात समाजाची एकता महत्त्वाची असते. आपला देश विविधता असलेला आहे. अनेक भाषा, धर्म, भौगोलिक विविधता यामुळे जेवण-खाणं, राहणीमान, जाती जमाती यामध्ये विविधता आधीपासूनच आहे. गेल्या हजार वर्षात भारतात बाहेरच्या देशातूनही काही परदेशी संप्रदाय आले. परदेशातून आलेले परत गेले पण त्यांचा धर्म स्वीकारलेले आजही अनेक कारणामुंळे त्याच संप्रदायत, परंपरांनुसार चालणारे आपलेच लोक भारतात आहेत. भारताच्या परंपरेत या सर्वांचं स्वागत आहे. त्यांना आपण वेगळ्या नजरेनं बघत नाही.
आपल्या विविधतेतलाच आपण आपलं विशेष मानतो आणि त्याचा अभिमान बाळगतो. पण हे विशेष भेदाचं कारण बनू नये. विविधता असूनही एका मोठ्या समाजाचा भाग आहोत. समाज, देश, संस्कृती या नात्यानं आपण एक आहोत. ही आपली ओळख आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायला हवी. त्यामुळे समाजात एकमेकांसोबतचं वागणं, बोलणं हे सद्भावनेतून आणि संयमाने असायला हवं असंही भागवत यांनी सांगितलं.
आपल्याकडे समाजात महापुरुष, पूजेचं स्थान प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कुणाचा अवमान होऊ नये याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. फक्त एकट्यानं करण्याचं हे काम नाही. यासाठी प्रबोधनाची गरज आहे. देशात विविधता आहे आणि सगळे एकत्र राहतात. जसं अनेक भांडी ठेवली असता भांड्याला भांडं लागतं तसं कुठे ना कुठे आवाज होतो. इतक्या मोठ्या समाजात कधी कधी आवाज होऊ शकतो. पण नियम, व्यवस्था पाळणं, सद्भावपूर्ण व्यवहार करण्याचा स्वभाव हवा अशी अपेक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहेच पण त्याचसोबत लोकांचीही जबाबदारी आहे असं सांगताना मोहन भागवत म्हणाले की, लहान मोठ्या गोष्टीवर किंवा मनात शंका आहे म्हणून रस्त्यावर उतरणं आणि गुंडागर्दी करणं, हिंसा करणं हे योग्य नाही. मनात काही ठेवून एखाद्याला भडकावण्यासाठी शक्तीप्रदर्शन करणं हे नियोजित असतं. त्याचे परिणाम चांगले नसतात. हे रोखण्याची गरज आहे. सरकारने हे काम नियमाने करावं. पण तरुणांनीसुद्धा संघटितपणे हे करायला हवं आणि हस्तक्षेप केलं पाहिजे. अराजकतेला रोखलंच पाहिजे.











