मुंबईत बुधवारी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली. मुंबईचे कमाल तापमान हे ३९ अंशावर पोहोचले असून ४० अंश पार करू शकतो अशी शक्यता वर्तवली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत राज्य सरकारला फटकारले आहे. या स्टोरीमध्ये आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडून केली जाणाऱ्या वृक्षतोडीच्या बातम्यांचे फोटो टाकले असून त्यासोबत एक पोस्ट शेअर केली आहे.
”जर कदाचित तुम्ही ही अशी अचानक तापमानात वाढ कशी झाली याबाबत आश्चर्य करत असाल तर सांगतो हे सरकार जोपर्यंत अधिकृतरित्या मुंबईला वाळवंट घोषित करत नाही तोपर्यंत थांबणार नाही”, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केले आहे.












