कोलकातामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही सेकंदाच्या अवधीत तीन भूकंपाचे धक्के जाणवले. याचा फटका मोठ्या इमारतींना बसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. भूकंप झाल्याचं समजताच नागरिक सैरावैरा पळत होते. अनेक नागरिक हे रस्त्यावर आले होते. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता तसेच दार्जिलिंग, सिक्कीम आणि नेपाळमध्ये शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. कोलकाता आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी दुपारी १:२२ वाजता हा भूकंप जाणवला. ५२ सेकंदांच्या कालावधीत येथे एकूण तीन भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५ इतकी होती.
भूकंपानंतर नबन्ना आणि पश्चिम बंगाल विधानसभा रिकामी करण्यात आल्याचे वृत्त आहे, तर अनेक लोक घाबरून रस्त्यावर उतरले होते. अनेक भागातील रहिवाशांनी सांगितले की, भूकंपाच्या धक्क्यांमध्ये छताचे पंखे हलले, फर्निचर हलले आणि खिडक्या हादरल्या, बहुमजली इमारतींना जास्त फटका बसला. त्याचप्रमाणे आज सकाळी दार्जिलिंगमध्ये २.५ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती, परंतु त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. भूकंपाचे केंद्र सिक्कीम असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या अखेरीपासून सिक्कीममध्ये सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळं घबराट पसरली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. आज पहाटे ४:१० वाजता सिक्कीममध्ये ३.७ तीव्रतेचा भूकंप झाला.यामुळं घबराट पसरली.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या मते, राज्याच्या विविध भागात अनेक लोकांनी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद केली आहे. अलिकडच्या काळात, सिक्कीम, विशेषतः पश्चिम सिक्कीममध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळं स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.












