आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. आज दि. १७ मार्च २०२६ रोजी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व २९४ उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबेल करत तृणमूलच्या जागा मागील निवडणुकीपेक्षा वाढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी भबानीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपने सुवेंदू अधिकारी यांना भबानीपूर आणि नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे.
पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी म्हणाल्या, “उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी मी बंगालच्या जनतेचे आभार मानते. मी ‘माँ, माती, मानुष’ आणि ‘बंगालची संस्कृती’ सर्वांना समर्पित करते आणि २९४ जागांची उमेदवार यादी प्रसिद्ध करते. मला भाजपला एक गोष्ट विचारायची आहे- तुम्ही का घाबरत आहात? जर तुम्हाला लढायचे असेल, तर गॅसचे संकट निर्माण करू नका; मैदानात कायदेशीर मार्गाने उतरा. निवडणूक आयोगाने (ECI) छान खेळ खेळला आहे… पण भाजपकडे कोणतीही संधी नाही. यावेळी तुमच्या जागा गेल्या वेळेपेक्षाही कमी होतील.”
“ही पश्चिम बंगालच्या अस्तित्वाची लढाई आहे. बंगालच जिंकेल. ‘दिल्लीचा लाडू’ इथे चालणार नाही… मी आज जे परिधान केले आहे ते आपल्या पक्षाचे चिन्ह आहे आणि त्याचा अर्थ ‘विजय’ असा आहे. माँ, माती, मानुष, बंगालची माती, येथील संस्कृती, ओळख आणि समाजातील सर्व घटक, सर्व जाती, धर्म आणि समुदायांचा सन्मान करत, आज आम्ही आमचा जाहीरनामा आणि २९४ उमेदवारांची यादी जाहीर करत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.
तृणमूलचा सर्वसमावेशकतेवर भर
एकूण २९४ जागांपैकी तृणमूल काँग्रेस २९१ जागा लढवणार आहे, तर दार्जीलिंग जिल्ह्यातील उर्वरित ३ जागा आपला मित्रपक्ष 'भारतीय गोर्खा प्रजातांत्रिक मोर्चा' (BGPM) साठी सोडल्या आहेत.
उमेदवार निवडीमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने लिंग आणि सामाजिक प्रतिनिधित्वावर मोठा भर दिला आहे.
पक्षाने एकूण:५३ महिला उमेदवार
९५ अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवार
४८ अल्पसंख्याक समुदायातील उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.











