kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दोन मंत्र्यांनी मला मध्ये घेतले होते, तिथून उठेपर्यंत मला त्यांची भीतीच वाटत होती ; शंभूराज देसाईंची मिश्किल फटकेबाजी

सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेचा पेच अद्याप कायम असताना, गुरुवारी (दि.१९) शिवजयंतीच्या निमित्ताने साताऱ्यात एक आगळेवेगळे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. एकाच मंचावर महायुतीचे तीन दिग्गज मंत्री एकत्र आले, पण त्यांच्यातील राजकीय अंतर मात्र लपून राहिले नाही. भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्याबरोबर मध्यभागी बसलेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, ‘दोन मंत्र्यांनी मला मध्ये घेतले होते, तिथून उठेपर्यंत मला त्यांची भीतीच वाटत होती,’ अशी मिश्किल फटकेबाजी करतानाच जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणला.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या २३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी सत्तेचा हा तिढा सुटणार का? यावर देसाई म्हणाले, जशी तुम्हा माध्यमांना उत्सुकता आहे, तशीच मलाही प्रचंड उत्सुकता आहे. एकदाचा या प्रश्नावर कायमचा पडदा पडला पाहिजे. महायुतीतील तिन्ही पक्षांना एकत्र यायचे होते, मात्र तसे घडले नाही. निवडणुकीपूर्वी मंत्री मकरंद पाटील आणि आम्ही एकमेकांसाठी जागा सोडल्या, चर्चा केली आणि निवडणूक लढवली. नगरपालिकेतही आम्ही एकीसाठी पाऊल पुढे टाकले होते, पण भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीलाही भाजपने गांभीर्याने घेतले नाही, परिणामी राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने एकत्र येत मोठे यश मिळविले.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेनेला १५, तर पंचायत समितीत ४६ जागांवर यश मिळाले आहे. या निवडून आलेल्या सर्व सदस्यांची मते आम्ही प्रत्यक्ष जाणून घेतली आहेत. त्यांच्या मनात असलेल्या भावना आणि राजकीय वस्तुस्थिती आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविली आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.