शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. कोविड काळात देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल, आयसोलेशन सेंटर्स, फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद, WHO कडून कौतुक अशा अनेक निर्णयांमागे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोणतेही होर्डिंग न लावता लाखो जीव वाचवण्याचे काम आम्ही केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेची आर्थिक शिस्त दाखवताना त्यांनी सांगितले की, सुरुवातीला ६५० कोटींची तूट असतानाही पुढे ९२ हजार कोटींचा सरप्लस निर्माण झाला. कोणताही कर न वाढवता, कोणतीही कपात न करता विकास साधला गेला. मात्र आज मुंबईवर अडीच लाख कोटींचे कर्ज लादले गेले आहे, असा आरोप त्यांनी केला.
महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल, सीबीएससी–आयसीएससी शिक्षण, दर्जेदार आरोग्य सेवा, स्वस्त पाणी, स्वस्त बेस्ट बस सेवा, राणीच्या बागेचा विकास, मॅन्ग्रोव्ह संवर्धन, पूरमुक्त मुंबईसाठी पावले — ही शिवसेनेची कामगिरी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, “आमच्या कामाचे क्रेडिट घेऊ नका. भाजपचे मुंबईतील एकमेव योगदान म्हणजे तिजोरी लुटणे.” धारावी प्रकल्प, पोस्टल रोड, बेस्ट बस, पाणी प्रकल्प यावरही त्यांनी सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“मुंबईचे नाव मुंबईतच राहिले पाहिजे, अदानी स्थान होऊ देणार नाही. मुंबई वाचवण्यासाठी ही लढाई आहे,” असे सांगत आदित्य ठाकरे यांनी शेवटी जनतेला आवाहन केले.
ठळक मुद्दे:
- कोविड काळात देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल मुंबईत
- WHO कडून उद्धव ठाकरे सरकारचे कौतुक
- कोणतेही कर न वाढवता ९२ हजार कोटींचा सरप्लस
- आज मुंबईवर अडीच लाख कोटींचे कर्ज – सरकारवर आरोप
- १२३५ महापालिका शाळा, सव्वातीन लाख विद्यार्थी
- डिजिटल, CBSE–ICSE शिक्षणाची सुरुवात
- बेस्ट बस दर स्थिर ठेवले, आज दर वाढीवर टीका
- देशातील सर्वात स्वस्त पाणी मुंबईत
- समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प सरकारने बंद केल्याचा आरोप
- राणीच्या बागेतून १७३ कोटींचे उत्पन्न
- १५,००० हेक्टर मॅन्ग्रोव्ह संवर्धन
- धारावी प्रकल्पाला स्थानिकांच्या विकासाशिवाय विरोध
- “मुंबई कोणाची?” – हा सवाल दिल्लीपर्यंत नेणार














