पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळ परिसरात हाणामारी झाल्याचा प्रकार गुरूवारी (17 जुलै) घडला.भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीमध्ये एकमेकांना भिडले आणि त्यातून हाणामारीचा लाजीरवाणा प्रकार घडला. विधिमंडळाच्या लॉबीत आणि पायऱ्यांजवळ पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना दूर केलं असलं, तरी हे प्रकरण बरंच चिघळलं. एकमेकांवर टीका करताना वापरण्यात आलेल्या अपशब्दांमुळे दोन आमदारांमधील वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला.
काही दिवसांपूर्वी आमदार पडळकर यांनी पुण्यातील मोर्चासमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. नंतर 10 जुलैला त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली होती.
दरम्यान, 11 जुलैला विधिमंडळ परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी ‘मंगळसूत्र चोरांचा, मंगळसूत्र चोरांचा’ अशा घोषणा दिल्या होत्या.त्यानंतर 16 जुलैला पडळकर आणि आव्हाड यांच्यात बाचाबाची झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं. त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हा बालिशपणा आहे. त्यांनी दरवाजाला लाथ मारली आणि तो दरवाजा आम्हा दोघांनाही लागला. या छोट्या गोष्टींकडे कुणीही लक्ष देत नाही म्हणून मी पुढे निघून आलो.”
“नंतर शिव्या देण्याची ही कुठली पद्धत आहे. त्यांनी आमच्या अंगावर गाडी का आणायची. व्हीडिओत काय झालंय सगळं दिसेल. मी मंगळसूत्र चोर ओरडलो. त्याचं त्यांना का वाईट वाटत आहे?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
आव्हाडांनी नंतर मी ‘मंगळसूत्र चोर’ हे कोणाचं नाव घेऊन म्हटलेलं नसल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, गुरुवारी (17 जुलै) जितेंद्र आव्हाड यांनी असा आरोप केला आहे की, पडळकर समर्थकांनी मोबाइलवर त्यांना शिवीगाळ केली असून धमकी दिल्या आहेत.
‘मंगळसूत्र चोर’ हे प्रकरण काय?
आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत.दुसरीकडे पडळकर यांच्यावर टीका करताना विरोधकांकडून ‘मंगळसूत्र चोर’ असा उल्लेख केला जातो.मध्यंतरी आमदार पडळकरांनीच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. ही घटना तशी 15 वर्षे जुनी आहे. या आरोपाला 2009 मध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितलं होतं.
ते म्हणाले होते, “मी कधी या विषयावर बोलत नाही. परंतु, माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा जो आरोप केला जातो, त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. मी 2009 साली विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा होतो. त्यावेळी तिथे एक उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते. त्यांना 17 इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता.”
“निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवाराचा दोन ते अडीच हजार मतांच्या फरकाने थोडक्यात पराभव झाला. मला त्या निवडणुकीत 19 हजारच्या आसपास मतं मिळाली. ते पराभूत उमेदवार तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अत्यंत जवळचे होते,” असं त्यांनी सांगितलं.
ते पुढं म्हणाले, “निवडणुकीनंतर गावाकडे एक लग्न होतं. त्या लग्नात मी प्रमुख पाहुणा होतो. तसा उल्लेखही त्या लग्नपत्रिकेत होता. परंतु, तिथं भांडणं झाली.”
त्यानंतर त्या लग्नातलं मंगळसूत्र चोरीला गेल्याचं प्रकरण पुढे आलं.
त्याबाबत बोलताना पडळकर पुढे म्हणाले, “भांडण झालं तेव्हा मी तिथं उपस्थितही नव्हतो. मी एक तास उशिरानं तिथं गेलो होतो. तरीसुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे राष्ट्रवादीचंच पाप आहे.”
“माझ्यावर जो मंगळसूत्र चोरीचा आरोप केला गेला तेव्हा 2009 मध्ये त्यांचा तिथं अपक्ष उमेदवार होता. त्याला 17 इच्छूक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता. तेव्हा मीही विधानसभा निवडणूक लढवली होती. मला 19 हजार मतं पडली आणि त्यांचा उमेदवार दोन अडीच हजार मतांनी पडला. त्यामुळे माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता,” असा आरोप पडळकरांनी केला.
“14 एप्रिल 2010 रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये माझ्यासह 8 जणांच्या विरोधात चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मला अटक देखील झाली होती. या प्रकरणी सांगली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला देखील सुरू होता, पण माझी निर्दोष मुक्तता झाली आहे. कारण माझा त्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता,” अशी माहिती पडळकरांनी दिली.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणाबाबत आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “हा गुन्हा 2010 मधला आहे. त्यावेळी हस्तलिखित स्वरूपात तक्रार दाखल करून घेतल्या जायच्या.”
“2017 नंतर ऑनलाईन सिस्टीम निर्माण झाली. जुने पोलीस ठाणे नवीन इमारतीत स्थलांतर झाले. त्यामुळे या गुन्ह्याचे कागदपत्र शोधावे लागतील. त्याला थोडा उशिरा लागेल. मिळाल्यावर ते देण्यात येतील,” असं सांगण्यात आलं.
जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले ?
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, असं माध्यमांशी बोलताना सांगितलं.मी ‘मंगळसूत्र चोर’ म्हणालो, पण मी त्यावेळी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं.हे वाक्यही मी त्यांच्यापासून 50 मीटर दूर अंतरावर म्हटलं, असं ते म्हणाले.
“पडळकर हे गेटवर मुलाखत देत उभे होते. मी त्यांच्याबाजूने जात होतो. त्यावेळी लगेच त्यांच्या मुलाखतीचा टोन बदलला आणि त्यांनी तिथं मुसलमानांचा विषय आणला आणि मला अप्रत्यक्षपणे ते बोलले,” असं आव्हाड म्हणाले.
पडळकरांनी 10 जुलै रोजी आव्हाडांना उद्देशून ‘अर्बन नक्षल’ आणि ‘मुसलमानांचा एक्स’ असं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीश देशमुख यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोरच ठिय्या आंदोलन केलं होतं.
त्यावेळी पोलिसांनी आव्हाड यांना अक्षरशः खेचून त्या वाहनासमोरून बाजूला केलं. आव्हाड हे वाहनाखाली गेले होते. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होतं.











