३७० रुपयांच्या बिर्याणी प्रकरणामुळे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर #BiryaniIsNotConsent हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. लोक त्याच्यावर टीका करत आहेत, तर काहीजण त्याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
एका स्टँडअप शोमध्ये प्रणित प्रेक्षकांशी संवाद साधत होता. त्यावेळी एका तरुणाने आपल्या डेटिंगचा अनुभव सांगताना ३७० रुपयांच्या बिर्याणीचा उल्लेख केला. त्याने एका महिलेला बिर्याणी खाऊ घातली होती आणि त्याबदल्यात त्याला काही लैंगिक अपेक्षा होत्या. मात्र, त्या महिलेने त्याला फक्त घरी सोडण्यास सांगितले, त्यामुळे त्याचा अपेक्षाभंग झाला.
त्या तरुणाला वाटलं की, तो खूपच गंमतीशीर अनुभव सांगत आहे. पण व्हिडीओ व्हायरल होताच लोक भडकले आणि त्याच्यावर टीका करू लागले. या वादात आता खुद्द मुंबई पोलिसांनीही उडी घेतली आहे. त्यांनी अशी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे, जी वाचून प्रणित मोरेही शॉक्ड होईल.
काय म्हणताहेत मुंबई पोलीस?
मुंबई पोलिसांनी अगदी मोजक्या शब्दांत पण थेट ३७० बिर्याणी प्रकरणावर भाष्य केलं आहे. प्रणित मोरेचा स्टँडअप शो रोस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या पोस्टमध्ये पोलिसांनीच त्याला रोस्ट केल्याचं म्हणता येईल.
पोलिसांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे, “३७० रुपयांत तुम्हाला एक प्लेट बिर्याणी मिळते. पण आमच्या लॉकअपमध्ये मोफत जेवण मिळतं. फक्त तिथे थोडा जास्त वेळ घालवावा लागतो. #BiryaniIsNotConsent.”
या पोस्टचा अर्थ असा आहे की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही खाऊ घातलं किंवा एखादी वस्तू भेट दिली, म्हणून त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं योग्य नाही. तसेच अशा वर्तनामुळे कायदेशीर अडचणीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जबाबदारीने वागणं गरजेचं आहे.















Leave a Reply