गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त व्हावा, या उद्देशानं गडचिरोलीच्या पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकलं आहे. सी-60, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या 18 पथकातील सुमारे 800 जवानांनी अभियान राबवून एकूण 44 माओवादी स्मारके एकाच दिवसात नष्ट केली आहेत. गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या दहशतीचे शेवटचे प्रतीक नष्ट करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचं मत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केलं आहे. अतिदुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्टया अतिसंवेदनशील आहे. येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठीआणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागात अनेक माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती. मात्र, गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जात असलेल्या प्रभावी माओवादविरोधी अभियानांमुळे जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळजवळ संपुष्टात आली आहे. सामान्य नागरिकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भीती कमी होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गडचिरोली पोलीस दलाकडून माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील एकूण 44 माओवादी स्मारके नष्ट करण्यात आली आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी माओवाद्यांनी जनतेच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी स्मारक उभारलेले निदर्शनास आले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस दलानं सुरक्षा आणि उपाययोजना करून बिडीडीएस पथक, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ, विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील मिळून एकूण 18 पथकातील जवानांनी जिल्ह्रातील विविध जंगल परिसरात शोध अभियान सुरू केले. यादरम्यान एकूण 15 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील एकूण 44 स्मारके माओवाद्यांनी बांधलेली असल्याचं दिसून आले. माओवादी स्मारकांची आणि परिसराची बिडीडीएस पथकानं कसून तपासणी केली. त्यानंतर जवानांनी स्मारके उद्धवस्त केली आहेत.
एटापल्ली उपविभागातील 18, हेडरी उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 5, जिमलगट्टा उपविभागातील 2, धानोरा उपविभागातील 1 आणि पेंढरी उपविभागातील 1 असे एकूण 44 माओवादी स्मारकांचा समावेश आहे. माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) इत्यादी गावातील माओवाद्यांची स्मारके उद्धवस्त करून गडचिरोली पोलीस दलानं परिसरातील नागरिकांमध्ये माओवाद्यांची असलेली उरलीसुरली दहशत संपवलेली आहे. ही केवळ भौतीक स्मारके नसून माओवाद्यांच्या हिंसाचार आणि दहशतीची निशानी होते. मात्र, गडचिरोली पोलीस दलानं ही स्मारके नष्ट केल्यानं ग्रामस्थांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होऊन पोलीस दलाबद्दल आणि प्रशासनाबद्दलचा त्यांचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.















