kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या पहिल्या मेट्रोचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन!

मीरा भाईंदर शहराला जोडणारी महत्त्वाकांक्षी मेट्रो 9 मार्गिका प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिसर पूर्व ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज पार पडलं. ठाणे जिल्ह्यातून धावणारी ही पहिली मेट्रो सेवा ठरली. या मेट्रोमुळं दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. यावेळी दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर रितू तावडे एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासह मेट्रो प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. मेट्रो 9चं आपण उद्घाटन केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो 7ला ही मेट्रो जोडली जाणार आहे. या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं कामही जवळपास 96 टक्के पूर्ण झालं आहे. याचवर्षी दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मेट्रोची कामं सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात सुरू झालेली ही पहिली मेट्रो ठरणार आहे. ही मेट्रो आणि कोस्टल रोड या दोघांमुळं येत्या काळात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक कमी होणार आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मुंबई आणि एम.एम.आर हा भाग जोडण्याचा आपला संकल्प आजच्या या उद्घाटनामुळं साध्य होत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच 2018 यावर्षी या मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं. आज पुन्हा ते मुख्यमंत्री असतानाच प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद आहे. 2019 साली देवेंद्र फडणवीस यांच मुख्यमंत्रिपद गेलं, त्यानंतर जरा कामाला ब्रेक लागला होता. मात्र, आमचं सरकार आलं. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री झालो आणि सगळे स्पीड ब्रेकर कायमचे हटवले. मेट्रोमुळं मोठा दिलासा हा सर्वसामान्य मुंबईकरांना आणि एमएमआरमध्ये राहणाऱ्या लोकांना मिळणार,” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मीरा-भाईंदरमध्ये असलेल्या एका पुलाची चर्चा पाहायला मिळत आहे. 4 लेन ते सरळ 2 लेन असा तो फ्लायओव्हर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फ्लायओव्हरमुळं अपघात होऊ शकतात, असं म्हटलं जात आहे. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तो पूल अजूनही पूर्ण झालेला नाही, जागा कमी आहे. लिमिटेड जागेमध्ये डिझाईन करण्यात आलं आहे. आता जे दिसतंय ते अर्धवट डिझाईन बघून त्याच्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. मात्र पूल पूर्ण झाला की आपल्या लक्षात येईल यासाठी पूर्ण उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *