प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अशातच आता आशा भोसले यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली अर्पण केली आहे.’
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘९२ वर्ष आशा भोसले जगल्या. त्यातल्या बहुतांश काळ, वयाच्या ५व्या ६व्या वर्षांपासून संगीताची सेवा केली ते अखेरच्या श्वासापर्यंत. या देशामध्ये सर्वात अष्टपैलू गायिका आशाताई होत्या. आशाताईंनी ‘तोरा मन दर्पण केहलाये’ हे क्लासिकल गाणंसुद्धा गायलं आणि त्याचवेळी आधुनिक ‘खतूबा’सारखं गाणं देखील तेवढ्याच लीलया त्यांनी गायलं. जेवढे संगीताचे प्रकार आहेत, २० पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गाणी गायली.’
‘त्याचबरोबर जगातील वेगळं उदहारण असं होतं की, ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ९०व्या वर्षी ३ तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या. आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला, त्यावेळी त्यांच्या जीवनाचा प्रवास त्यांनी सांगितला, किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोहोचल्या हे खरोखर प्रेरणादायी होतं.’
‘मला आठवतंय की, रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतलेला त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंना मला दोन ओळी गुणगुणायला लावल्या आणि म्हणाल्या, ‘बघा माझी शक्ती…मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही गायला लावू शकते.’ असं अतिशय जिंदा दिल व्यक्तिमत्व होतं. कुठल्याही कार्यक्रमाचा प्राण त्या असायच्या. आशाताई सतत उत्साही असायच्या. आम्हाला पूर्ण खात्री होती की, आशाताईंची शंभरावी करू, पण काळनं ती संधी दिली नाही. ईश्वरीय आवाज असलेल्या गायिका आमच्यातून निघून गेल्या. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत. पूर्ण शासकीय इतमामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ते ठरवतील त्याप्रमाणे पुढचे विधी होतील. पण, मला असं वाटतं की संगीताकरिता आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.













Leave a Reply