भारत हा एक सार्वभौम देश असून तो आपल्या राष्ट्रीय हितासाठी कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतावर निर्बंध लादण्याचा कोणताही संभाव्य प्रयत्न झाल्यास त्याचे परिणाम त्वरित उलट (बूमरँग) होतील, असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी (5 जून) सांगितलं. मॉस्को इथं आयोजित ‘सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम’ (SPIEF) 2026 च्या पूर्ण सत्रात व्लादिमीर पुतिन बोलत होते.
व्लादिमीर पुतिन यांनी भारताचा उल्लेख एक भावासारखा आणि विश्वासू भागीदार असा केला. तसंच, भारतासोबतच्या भागीदारीप्रती रशियाची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करतानाच, भारतासोबतचे रशियाचे सहकार्य कोणत्याही राजकीय परिस्थितीमुळं प्रभावित होत नाही, यावरही त्यांनी भर दिला. त्यांनी सांगितलं की, भारत हा रशियाच्या सर्वात महत्त्वाच्या भागीदारांपैकी एक आहे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीचा द्विपक्षीय सहकार्यावर कोणताही परिणाम होत नाही. “आमचे संबंध सर्वार्थानं अतिशय चांगले, विश्वासावर आधारित आणि बंधुत्वाचे राहिले आहेत,” असं व्लादिमीर पुतिन म्हणाले.
भारताच्या मनुष्यबळाची प्रशंसा करताना व्लादिमीर पुतिन यांनी सांगितलं की, भारतीय अत्यंत सुशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त नैपुण्य आहे. विशेषतः कोडिंग आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये आहे. “आयटी (IT) उद्योगातील आघाडीच्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत भारताचा मोठा वाटा आहे,” असं व्लादिमीर पुतिन म्हणाले.
याचबरोबर, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील तणावामुळं निर्माण झालेल्या अलीकडील व्यत्ययांचा उल्लेख करत व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियन आणि भारतीय कंपन्यांनी सहकार्य अधिक दृढ करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. रशिया भारत आणि इतर आशियाई बाजारपेठांना होणारा पुरवठा वाढवत आहे आणि त्याच वेळी आपल्या भागीदारांशी तांत्रिक उपाययोजनांची देवाणघेवाणही सुरू ठेवत आहे, असं व्लादिमीर पुतिन यांनी सांगितलं.
भारतासोबतच्या मॉस्कोच्या भागीदारीबाबत बाह्य शक्तींकडून आदेश दिले जाऊ शकत नाहीत, यावरही व्लादिमीर पुतिन यांनी भर दिला. “भारतासोबतचे आमचे सहकार्य, हे आमच्या इतर सर्व भागीदारांसोबतच्या सहकार्याप्रमाणेच राजकीय परिस्थितीवर अवलंबून नाही. भारताला काय पुरवावे किंवा काय पुरवू नये, याबद्दल आम्हाला कोणीही आदेश देऊ शकत नाही,” असं व्लादिमीर पुतिन म्हणाले. याचबरोबर, रशिया आपल्या भागीदारांना, विशेषतः भारत यांसारख्या देशांना दिलेल्या वचनांचे पालन करणे सुरूच ठेवेल, असं त्यांनी पुढं सांगितलं.
याशिवाय, संरक्षण क्षेत्रातील संबंधांवर भर देत व्लादिमीर पुतिन म्हणाले की, भारत आणि रशिया यांच्यात सोव्हिएत काळापासून चालत आलेलं लष्करी आणि तांत्रिक सहकार्याचं दीर्घकालीन नातं आहे. “भारतीय सशस्त्र दलांचा एक मोठा भाग रशियन उपकरणांनी सज्ज आहे. ही सोव्हिएत काळापासून चालत आलेली परंपरा आहे,” असं व्लादिमीर पुतिन म्हणाले. दरम्यान, व्लादिमीर पुतिन यांच्या मते, हे संबंध केवळ संरक्षण सामग्रीची खरेदी-विक्री करण्यापुरते मर्यादित नसून त्यात संयुक्त संशोधन आणि विकास प्रकल्पांचाही समावेश आहे.
















Leave a Reply