गेल्या महिन्यात नीट पेपर फुटीविरोधात दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. या प्रकरणी पोलिसांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. एफआयआर दाखल होत असल्यानं राहुल गांधी यांनी पीडित विद्यार्थ्यांसह ठिय्या दिला. यानंतर, ५ तासांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. याबद्दलची प्रक्रिया संसद मार्ग पोलीस ठाण्यात पूर्ण करण्यात आली आहे.
जंतरमंतर आणि कनॉट प्लेसमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनच्या वापर झाल्याचा राहुल गांधी यांचा दावा आहे. पॅलेट गनचा फटका बसलेल्या साहिलच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी घेऊन राहुल गांधी यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेसचे नेते आणि पोलीस यांच्यात वाद झाला.
२० जुलैला विद्यार्थी आंदोलनादरम्यान कनॉट प्लेस परिसरात पॅलेट गनचा वापर झाला होता, असा दावा राहुल गांधी यांनी ठामपणे केला. ‘साहिलच्या शरीरात २०० पेक्षा जास्त छर्रे आहेत. त्याच्या डोळ्याला ३ छर्रे लागले आहेत. शरीरात मोठ्या प्रमाणात छर्रे असल्याचं एम्सच्या अहवालातूनही समोर आलेलं आहे. शुक्रवारी सकाळीदेखील मी एका पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यांनी मला दुसऱ्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं,’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं. तक्रार नोंदवून कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून पीडित तरुणाला सातत्यानं त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप गांधी यांनी केला.













