पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांची राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्यांना संपलेला बोलले, त्यांच्याच सोबत आता रोज जात आहेत. चल मेरे भाई हात जोडता हूँ.. या गाण्याची आठवण होत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेनी शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेवरुन टोला लगावला आहे. अधिवेशनात थेट शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालं. आता, विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर थेट प्रहार केला आहे.
३ वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा झाली, मी अंबादास यांचं कौतुक करता होतो, कोणाला काय इतकं लागण्याच कारण नव्हतं. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूक, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिला नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
ज्यांना संपलेला बोलले, त्यांच्याच सोबत आता रोज जात आहेत. चल मेरे भाई हात जोडता हूँ.. या गाण्याची आठवण होत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेनी शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेवरुन टोला लगावला. देवेंद्रजी यांना किती शिव्या दिल्या याचे साक्षीदार आम्ही आहोत. जनतेने शिवसेना भाजपला मतदान केलं होतं. आम्ही ताटात माती कशी कालवली? माती तर तुम्ही केली, देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खूपसला. निकालानंतर देवेंद्रजी यांनी अनेक फोन केले, पण फोन उचलला नाही, केलेलं इथंच फेडावं लागतं. मुंबईचं महापौरपद देवेंद्र फडणवीस यांना मिळालं होतं, तेव्हा अर्ध्या तासात त्यांनी महापौरपद शिवसेनेला दिलं. पण, परतफेड न करता दगाबाजी केली. साधा फोन उचलायचा असतो, अशी आठवण एकनाथ शिंदेंनी आजच्या भाषणातून करुन दिली.














