राज्यात सध्या हनीट्रॅपच्या प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे. नाशिकमध्ये हनीट्रॅपचं प्रकरण समोर आलं होतं. एका महिलेने तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. तसेच ठाणे आणि नवी मुंबई येथून तक्रार आल्याची चर्चा होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत माहिती दिली. ना हनी आहे, ना ट्रॅप आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा दावा फेटाळला. केवळ नाशिकमधून एक तक्रार आली होती. ती तक्रारदेखील आता मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. पण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात थेट पेनड्राईव्ह आणून दाखवला होता. संबंधित पेनड्राईव्हमध्ये हनीट्रॅपचे प्रकरण कैद असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला होता. पण ते आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले होते. नाना पटोले यांच्याकडून सरकारला काही माहिती मिळाली नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनीट्रॅपबाबत प्रतिक्रिया दिली. हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे आणि विरोधी पक्ष नेत्यांकडे आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही. म्हणून आपण चूप आहोत. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्या प्रकरणामुळे आलं. शिंदेंच्या सरकार आलं, जे सत्तापालट झालं ते सीडीमुळे झालं. एवढं मोठं ते प्रकरण आहे. अनेक ऑफिसर, अनेक मोठी माणसं त्यात आहेत. त्यावर खूप बोलण्याची गरज नाही”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
“आम्ही ती माहिती उघड केली तर लोकांना पाहण्यासाठी तिकीट लावावं लागेल, आणि ती खास आमंत्रित लोकांनाच दाखवली जाईल, इतकी ती गंभीर आहे. ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपये असं तिकीटच लावावं लागेल. ते तिकीट लावूनच सर्व चित्र दाखवावं लागेल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, याच विषयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत गुरुवारी मोठा आरोप केला होता की, मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहेत. यासंदर्भात त्यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवत पुरावा असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावत त्याची खिल्ली उडवली होती. “नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.














