उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत लँडिंग करताना अपघात झाला असून या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली. देशभरातून विविध नेते तसेच राजकीय लोकांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारामतीतील ज्या काटेवाडी इथं अजित पवार यांचा जन्म झाला, लहानाचे मोठे झाले आणि तिथून पहाटे कामाची सुरुवात करायचे, त्या काटेवाडीत अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अजित पवार यांचं पार्थिव थोड्याच वेळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. लाडक्या दादाच्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते काटेवाडी इथं दाखल झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह अंत्यसंस्काराला येण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आता दादांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठाणच्या मैनाकडं नेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडीमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर अँब्युलन्सनं पार्थिव ग. दि. मा. संभागृहापर्यंत नेण्यात येईल. सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आज पहाटेपासूनच काटेवाडी तसेच राज्यभरातील कार्यकर्ते अजित पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी सुप्रिया सुळे तसेच भाऊ श्रीनिवास पाटील, योगेंद्र पवार हे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. यावेळी काटेवाडी इथं जमलेल्या लोकांशी बातचीत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी बातचित केली आहे. ईटीव्ही भारतकडं अजित पवार यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.















