“दादा परत या…” हा आक्रोश करत बारामतीत काटेवाडी येथे लाखोंच्या जनसमुदायाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. “दादा परत या…” हा आक्रोश केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिला नव्हता, तर तो प्रत्येक बारामतीकराच्या श्वासात, प्रत्येक नजरेत उतरलेला होता. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून झाली आणि शेवटचा श्वासही त्यांनी बारामतीत घेतला. ‘एकच वादा अजित दादा’, अशी घोषणा देत नागरिकांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. बारामतीत काटेवाडी येथे शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखोंच्या जनसमुदायाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी प्रमुख नेत्यांबरोबर राज्यातील सर्व नेते उपस्थित होते.
पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबीयांनी अजित पवारांचे अखेरचे दर्शन यावेळी घेतले.
पत्नी सुनेत्रा पवार यांनी ३७ वर्षे अजितदादांबरोबर सहजीवनाचा प्रवास केला. तो आज अखेर संपला. अजितदादांना अखेरचा निरोप देताना दादा परत या..! हा आक्रोश शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता.
अजित पवारांच्या निधनामुळे आज महाराष्ट्रासह बारामती निःशब्द झाली होती. पाणावलेले डोळे आणि सुन्न झालेले चेहरे अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी व्याकूळ झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्षण अंतःकरण हेलावून टाकणारा होता. आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी कसलीही तमा न बाळगता बारामतीकडे धाव घेतली. कुणी दुचाकीवर, कुणी चारचाकीत, तर अनेक जण पायीच पोहचले. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथे दाखल झाले. परिसरात कुठेही गोंगाट नव्हता; मात्र त्या शांततेत दडलेला शोक अधिकच बोचरा वाटत होता.
पवार कुटुंबीय आणि बारामतीकरांचे नाते अतूट आहे. देशाच्या, राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने या कुटुंबाने ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे १९८८ मध्ये बारामतीची सूत्रे सोपविली. त्यानंतर अजित पवार यांनी मागे वळून पाहिले नाही. बारामतीकरांनी त्यांना सात वेळा आमदारकी बहाल करीत भरभरून प्रेम केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील बारामतीकरांच्या प्रेमाची जाणीव ठेवत शहर तालुक्याचा कायापालट केला. पहाटे सहापासून बारामतीकरांसाठी अहोरात्र झटणाऱ्या अजित पवार यांनी शेवटचा श्वास देखील बारामतीच्याच भूमीत घेतला. बारामती देशातील क्रमांक एकचे शहर करण्याचे त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. बारामतीत सध्या आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी सुशोभीकरण, जिरायती भागासाठी वरदान ठरणारी कऱ्हा – निरा योजना, शिवसृष्टी अशा एक ना अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, या सर्व विकासकामांच्या उद्घाटनापूर्वीच उपमुख्यमंत्री पवार निघून जाण्याचा धक्का बारामतीकर सहन करू शकले नाहीत.















